
नांदेड, 01 जुलै, (हिं.स.)। भारत सरकारच्या Data Driven Hyperlocal Intervention (DDHI) या उपक्रमांतर्गत येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या सूचनेनुसार एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेचे उद्घाटन प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे, प्रकल्प संचालक महेश पाटील आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके यांच्या हस्ते झाले. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी तसेच आयआयटी मद्रासच्या Centre of Excellence for Road Safety (CoERS) येथील तज्ज्ञ रोशन जोस आणि प्रदीप कुमारजी उपस्थित होते.
उपस्थितांना संबोधित करताना रस्ता सुरक्षा ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे अधोरेखित करण्यात आले. जिल्ह्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस, आरटीओ, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक आदी विविध विभागांमध्ये प्रभावी समन्वय साधून उपाययोजना राबविण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली.
या अनुषंगाने संबंधित विभागांतील प्रत्यक्ष काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी कोणत्या उपाययोजनात्मक कार्यवाही कराव्यात तसेच आवश्यक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, याबाबत तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
महाराष्ट्रातील निवडक जिल्ह्यांमध्ये नांदेड जिल्ह्याची या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी निवड करण्यात आली असून, त्याअंतर्गत अपघातांचे वैज्ञानिक विश्लेषण, डेटा-आधारित नियोजन आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर विशेष भर देण्यात आला.
कार्यशाळेत आयआयटी मद्रासच्या CoERS तज्ज्ञांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली iRAD/eDAR प्रणालीचा प्रभावी वापर, अपघातांची कारणमीमांसा तसेच विविध विभागांतील समन्वय अधिक सक्षम करण्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले.
तसेच DDHI/FPS अर्ज प्रक्रिया, FPS- क्षेत्रीय सज्जता सर्वेक्षण, TPL- आघात-विषयक सज्जता स्तर, धोका ओळख, अहवाल प्रणाली तसेच भूमिका व जबाबदाऱ्या याविषयी प्रशिक्षण देण्यात आले. ट्रॉमा केअर व आपत्कालीन प्रतिसाद यावर स्वतंत्र सविस्तर सत्र आयोजित करण्यात आले. निवडक ठिकाणी प्रत्यक्ष प्रात्यक्षिके आणि क्षेत्रीय सरावही घेण्यात आला.
या उपक्रमामुळे जिल्ह्यातील रस्ता सुरक्षा व्यवस्थापन अधिक परिणामकारक होऊन अपघातांचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
या कार्यशाळेत पोलीस विभाग, आरटीओ, रस्ता मालकी संस्था, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, नांदेड-वाघाळा महानगरपालिका यांचे अधिकारी सहभागी झाले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis