
रायगड, 01 जुलै (हिं.स.)। रायगड जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय तसेच खासगी क्षेत्रातील आस्थापनांनी आपल्या कर्मचाऱ्यांची त्रैमासिक सांख्यिकी (ईआर-१) माहिती ऑनलाइन पद्धतीने सादर करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्रभारी सहायक आयुक्त श्रीकांत कोकाटे यांनी केले आहे.
सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे अधिसूचित करणे सक्तीचे) कायदा, १९५९ आणि नियम, १९६० नुसार सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय तसेच खासगी क्षेत्रातील पात्र आस्थापनांसाठी दर तिमाहीअखेर त्यांच्या आस्थापनावरील पुरुष व महिला कर्मचाऱ्यांची माहिती सादर करणे बंधनकारक आहे.
एप्रिल ते जून २०२६ या तिमाहीचे ईआर-१ विवरणपत्र ३१ जुलै २०२६ पर्यंत महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या महास्वयम पोर्टलवर ऑनलाइन सादर करावे. यासाठी आस्थापनांनी पोर्टलवरील Employment टॅबमधील Employer (List a Job) पर्यायावर क्लिक करून आपल्या युजर आयडी व पासवर्डच्या माध्यमातून लॉगिन करावे. त्यानंतर आस्थापनेची माहिती अद्ययावत करून ER-1 पर्यायातून अचूक माहिती भरावी.
याशिवाय प्रत्येक आस्थापनेने आपला Employer Profile अद्ययावत ठेवणेही आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. माहिती भरण्यास किंवा युजर आयडी व पासवर्डसंदर्भात अडचण असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी दूरध्वनी क्रमांक ०२१४१-२२२०२९ किंवा लिपिक-टंकलेखक म. भा. वखरे यांच्या ९४२१६१३७५७ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)