
अमरावती, १ जुलै (हिं.स.) : अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाचा पाच वर्षांचा कार्यकाळ ४ ऑक्टोबर २०२६ रोजी संपुष्टात येत असल्याने बँकेच्या आगामी निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पात्र संलग्न सभासद संस्थांकडून प्रतिनिधी नियुक्तीचे ठराव मागविण्यात आले असून, हे ठराव २२ जुलैपर्यंत संबंधित उपनिबंधक किंवा सहायक निबंधक कार्यालयात सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
जिल्हा बँक 'अ' वर्गातील सहकारी संस्था असल्यामुळे निवडणूक प्रक्रिया विभागीय सहनिबंधकांच्या नियंत्रणाखाली पार पडणार आहे. प्रतिनिधी नियुक्तीच्या ठरावांची छाननी झाल्यानंतर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर निवडणुकीचे सविस्तर वेळापत्रक जाहीर होणार आहे.
सध्या आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ कार्यरत असून, त्यांनी प्रस्थापितांना धक्का देत जिल्हा बँकेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात प्रवेश करत अध्यक्षपदावरही मजल मारली होती. मात्र, त्यांचा कार्यकाळ संपत आल्याने नव्या संचालक मंडळाच्या निवडीसाठी राजकीय आणि सहकार क्षेत्रात हालचालींना वेग आला आहे.
दरम्यान, शासनाच्या नव्या अध्यादेशानुसार सलग दहा वर्षे संचालक राहिलेल्या दहा विद्यमान संचालकांना यावेळी निवडणूक लढविता येणार नसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची चर्चा रंगली आहे. या अध्यादेशाविरोधात संबंधित युनियनने न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्यावरील निर्णयाकडे इच्छुक उमेदवारांसह सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी गौतम वर्धन यांनी सर्व पात्र सभासद संस्थांना २३ जून ते २२ जुलैदरम्यान संचालक मंडळाची बैठक घेऊन प्रतिनिधी नियुक्तीचा ठराव मंजूर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या ठरावांच्या आधारे अंतिम मतदार यादी तयार होणार असल्याने ही प्रक्रिया निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळात वैयक्तिक सभासद, सॅलरी अर्नर्स, राखीव प्रवर्ग तसेच संलग्न संस्थांच्या प्रतिनिधी अशा विविध प्रवर्गांतून एकूण २१ संचालकांची निवड केली जाते. त्यामुळे आगामी निवडणुकीकडे जिल्ह्यातील सहकार आणि राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले असून, येत्या काही आठवड्यांत उमेदवारी, आघाड्या आणि राजकीय समीकरणांना अधिक वेग येण्याची शक्यता आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी