
आरोग्यमंत्र्यांनी सभागृहात केली स्वतंत्र बैठकीची घोषणा
अमरावती, १ जुलै (हिं.स.) : अमरावतीतील ४०० खाटांच्या नवीन जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन) येथील डॉक्टर आणि परिचारिकांच्या रिक्त पदांचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. आमदार सुलभा खोडके यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी पदस्थापनेबाबत स्वतंत्र बैठक घेण्याची घोषणा केली.
डफरीन रुग्णालयात अमरावती शहरासह ग्रामीण भाग, मेळघाट, धारणी तसेच मध्यप्रदेश सीमावर्ती भागातील महिला उपचार आणि प्रसूतीसाठी येतात. २०२४ मध्ये ४०० खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय सुरू झाले असले तरी डॉक्टर आणि परिचारिकांच्या कमतरतेमुळे आरोग्यसेवेवर मोठा ताण निर्माण झाला आहे.
या संदर्भात शासनाकडे पाठविलेल्या प्रस्तावाचा सातत्याने पाठपुरावा करत आमदार सुलभाताई खोडके यांनी पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा पुन्हा उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी रिक्त पदे भरण्याबरोबरच आवश्यक नवीन पदेही प्रस्तावित करण्याबाबत सकारात्मक कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.
याशिवाय, डफरीन, इर्विन आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालयांतील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असेही त्यांनी सभागृहात स्पष्ट केले.
राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या घोषणेमुळे डफरीन रुग्णालयाला लवकरच आवश्यक वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यामुळे महिला रुग्णांना अधिक दर्जेदार, तत्पर आणि प्रभावी आरोग्यसेवा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी