
सोलापूर, 01 जुलै (हिं.स.)। ग्रामीण भागातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ सूचना, मदत आणि समन्वय उपलब्ध करून देणारी 'ग्राम सुरक्षा यंत्रणा' आर्थिक अडचणींमुळे ३० जूनपासून बंद करण्याचा निर्णय व्यवस्थापनाला घ्यावा लागला आहे. ग्रामपंचायतींकडून नियमित निधीची तरतूद न होणे आणि देयकांची पूर्तता न झाल्याने ही अत्यंत उपयुक्त सेवा बंद पडण्याच्या स्थितीत आली आहे.
'बहुदा जगातील सर्वोत्तम आपत्कालीन संपर्क यंत्रणा' हे ब्रीद घेऊन सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागात आपत्कालीन परिस्थितीत तातडीने माहिती देणे, मदत पोहोचविणे आणि विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधणे शक्य होत होते. मात्र, सेवा बंद झाल्याने भविष्यातील आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मदत कशी मिळणार, याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
२०२१ मध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत प्रत्येक गावात सुरुवातीच्या दहा घटनांपर्यंत कोणताही निधी न घेता मोफत सेवा देण्यात आली होती. त्यानंतर या यंत्रणेचे महत्त्व लक्षात आल्यानंतर प्रति कुटुंब वार्षिक केवळ ५० रुपये इतक्या अत्यल्प दराने निधी स्वीकारण्यास सुरुवात करण्यात आली. कोरोना काळातही निधी न भरलेल्या गावांना सलग दोन वर्षे अखंडित सेवा देण्यात आली होती.
मात्र, अनेक ग्रामपंचायतींकडून आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली नाही. तसेच नियमित देयकेही अदा न झाल्याने यंत्रणेच्या देखभाल, तांत्रिक व्यवस्थापन आणि संचालनासाठी आवश्यक आर्थिक संसाधनांचा तुटवडा निर्माण झाला. परिणामी, ही सेवा सुरू ठेवणे अशक्य बनल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.
या निर्णयामुळे ग्रामीण भागातील आपत्कालीन संपर्क व्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, ही सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी शासन, ग्रामपंचायती आणि लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड