
अमरावती, १ जुलै: अमरावती–परतवाडा राज्य मार्गावरील आसेगाव पूर्णा टी-पॉईंट येथे लोकविकास संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बुधवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. गोपाल भालेराव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी झाले.
सरसकट शेतकरी कर्जमाफी, पिकविमा योजनेचा लाभ, शेतीमालाला हमीभाव तसेच इतर प्रलंबित मागण्या तातडीने मंजूर कराव्यात, अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी काही काळ रस्त्यावर ठिय्या देत शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
या आंदोलनामुळे अमरावती–परतवाडा राज्य मार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त तैनात करून परिस्थिती नियंत्रणात ठेवली.
शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांची तातडीने दखल घ्यावी, अन्यथा आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला.
------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी