
परभणी, 01 जुलै (हिं.स.)।खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अमृतच्या लक्षित घटक उमेदवारांसाठी युपीएससी मुख्य परीक्षा व मुलाखत पूर्वतयारी प्रोत्साहनात्मक अर्थसाहाय्य योजना: पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) तर्फे राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील तसेच अमृतच्या लक्षित गटातील उमेदवारांसाठी संघ लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा मुख्य परीक्षा व मुलाखत पूर्वतयारीसाठी प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य योजना सन २०२६-२७ मध्ये राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
अमृतच्या लक्षित गटामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, वैश्य, नायर, नायडू, कम्मा, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुंथर, गुजराती, जाट, हिंदू नेपाळी, भूमिहार, लोहाणा, कानबी आदी समाजघटकांचा समावेश आहे.
सन २०२६-२७ मध्ये संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व परीक्षा-२०२६ मध्ये उत्तीर्ण झालेल्या व या योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असलेल्या पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत संकेतस्थळावरील संबंधित सूचना काळजीपूर्वक वाचून त्यानुसार ऑनलाइन अर्ज भरावा.
योजनेअंतर्गत पात्र उमेदवारांना संघ लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी रुपये ५० हजार इतके प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. तसेच मुलाखत पूर्वतयारीसाठी रुपये २५ हजार इतके अर्थसहाय्य प्रदान करण्यात येणार आहे.
ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी अमृतच्या https://mahaamrut.org.in/ अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा. योजनेबाबतची सर्व माहिती, सूचना व अद्यतने अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. ऑनलाइन अर्ज भरण्याबाबत अडचण असल्यास परभणी जिल्हा अमृत कार्यालयाशी ७३९१०६५४७३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी अमृत जिल्हा कार्यालय,जुनी प्रशासकीय इमारत, पहिला मजला, बी.एस.एन.एल. कार्यालयाच्या बाजूला, परभणी येथे संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक अनिरुध्द काटे यांनी केले आहे.
--------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis