यवतमाळमध्ये पांढरकवड्यात अठरा लाखांचा अवैध व मुदतबाह्य कृषी साठा जप्त
अमरावती, 01 जुलै (हिं.स.) जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात कृषी विभागाने खैरगाव (दे.) येथील एका रहिवासी घरावर छापा टाकून विनापरवाना साठवून ठेवलेला सुमारे १७ लाख ८२ हजार १३५ रुपये किमतीचा अवैध, प्रतिबंधित आणि मुदतबाह्य कीटकनाशके, रासायनिक खते तसेच जै
यवतमाळमध्ये पांढरकवड्यात अठरा लाखांचा अवैध व मुदतबाह्य कृषी साठा जप्त


अमरावती, 01 जुलै (हिं.स.) जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात कृषी विभागाने खैरगाव (दे.) येथील एका रहिवासी घरावर छापा टाकून विनापरवाना साठवून ठेवलेला सुमारे १७ लाख ८२ हजार १३५ रुपये किमतीचा अवैध, प्रतिबंधित आणि मुदतबाह्य कीटकनाशके, रासायनिक खते तसेच जैवउत्तेजकांचा साठा जप्त केला. ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पांढरकवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कृषी क्षेत्रात या कारवाईमुळे मोठी खळबळ माजली आहे.

पांढरकवडा पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय कृषी विभागाच्या भरारी पथकाने संयुक्तपणे खैरगाव येथील रहिवासी यश गजानन शिवनवार (२६) यांच्या घरी अचानक छापा टाकला. या तपासणी दरम्यान आरोपीने स्वतःच्या बेकायदेशीर आर्थिक फायद्यासाठी कोणताही वैध परवाना नसताना घरात हा घातक साठा दडवून ठेवल्याचे उघडकीस आले. कृषी विभागाने पंचांसमक्ष एकूण २ हजार २८५ किलो मुद्देमाल जप्त करून तात्काळ सीलबंद केला आहे.जप्त करण्यात आलेल्या साठ्यामध्ये प्रामुख्याने अत्यंत घातक आणि मुदत संपलेल्या कीटकनाशकांचा समावेश आहे. एकूण ३५८.५५ किलो वजनाची मुदतबाह्य कीटकनाशके जप्त करण्यात आली असून, बाजारभावानुसार त्यांची किंमत ८ लाख ४९१ रुपये आहे. या कीटकनाशकांच्या वापरामुळे पिकांचे आणि जमिनीचे मोठे नुकसान होऊ शकत होते.

याशिवाय, पथकाने घरातून १ हजार ७३५ किलो वजनाचा अनाधिकृत रासायनिक खतांचा साठाही हस्तगत केला आहे, ज्याची किंमत ४ लाख ५६ हजार ५० रुपये आहे. तसेच, पिकांची वाढ जलद गतीने करण्याचा दावा करणारी विविध प्रकारची अनधिकृत जैवउत्तेजके जप्त करण्यात आली आहेत. या जैवउत्तेजकांचे एकूण वजन १८८.१५ किलो असून त्याची किंमत ५ लाख २२ हजार ५९४ रुपये एवढी आहे.

ही यशस्वी आणि धडक कारवाई राज्याच्या कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये अमरावती विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक, यवतमाळचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक तसेच पांढरकवडा, कळंब आणि मारेगाव येथील कृषी अधिकाऱ्यांच्या विशेष भरारी पथकाने सहभाग घेतला. खरिपाच्या ऐन हंगामात शेतकऱ्यांना बनावट आणि मुदतबाह्य खते किंवा कीटकनाशके विकून फसवणाऱ्या टोळ्यांविरुद्ध यापुढेही अशीच कडक मोहीम राबवली जाईल, असा इशारा कृषी विभागाने दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande