
परभणी, 01 जुलै, (हिं.स.)। राज्यातील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल दांपत्यांना आयव्हीएफ उपचारांचा लाभ शासकीय योजनेतून मिळावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी आमदार डॉ. राहुल पाटील यांनी सभागृहात करताच आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आयव्हीएफ उपचारांचा महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समावेश करण्याची घोषणा केली.
पावसाळी अधिवेशनातील प्रश्नोत्तराच्या तासात आमदार राहुल पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, आजच्या काळात अनेक कुटुंबांसाठी आयव्हीएफ ही नितांत गरज बनली आहे. मात्र उपचारांचा प्रचंड खर्च सर्वसामान्यांना परवडत नसल्याने अनेकांचे पालकत्वाचे स्वप्न अपूर्ण राहते. त्यामुळे शासनाने राज्यातील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल दांपत्यांना आयव्हीएफ उपचारांचा लाभ शासकीय योजनेतून मिळावा अशी मागणी केली. यावर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आयव्हीएफ उपचारांचा महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समावेश करण्याची घोषणा केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis