
पुणे, 01 जुलै (हिं.स.)। राज्यातील वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बसविणे सक्तीचे नसल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. तसेच ग्राहकांच्या घरांमध्ये ‘प्री-पेड’ मीटर बसविले जात नसून, ‘पोस्ट-पेड’ स्मार्ट मीटरचीही कोणतीही सक्ती करण्यात आलेली नाही, अशी माहिती महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
महावितरणच्या माहितीनुसार, राज्यभरात आतापर्यंत सुमारे १ कोटी २० लाख स्मार्ट मीटर बसविण्यात आले असून, त्यापैकी पुणे विभागात १४ लाख ७२ हजार स्मार्ट मीटर कार्यान्वित आहेत. या मीटरमुळे वीज वापराचे अचूक रीडिंग मिळत असल्याचा दावा महावितरणने केला आहे.
स्मार्ट मीटर बसविल्यानंतर ग्राहकांना मोबाईल ॲपच्या माध्यमातून दर तासाला होणारा वीज वापर पाहता येतो. त्यामुळे वीजबिलामध्ये अधिक पारदर्शकता येते आणि ग्राहकांना त्यांच्या वीज वापरावर नियंत्रण ठेवणे सोपे होते. घर किंवा कार्यालयातील वीजगळतीची माहितीही या प्रणालीद्वारे मिळू शकते. तसेच दिवसभरात कोणत्या वेळेत किती वीज वापरली गेली, याची तपशीलवार माहिती उपलब्ध होते.
महावितरणच्या माहितीनुसार, घरगुती ग्राहकांनी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीत वीज वापरल्यास प्रति युनिट ८५ पैशांची सवलत दिली जाते. त्यामुळे दिवसा वीज वापर वाढविणाऱ्या ग्राहकांना आर्थिक लाभही मिळू शकतो.
महावितरणने स्पष्ट केले की, स्मार्ट मीटर बसविण्यासाठी ग्राहकांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. मीटरमध्ये बिघाड झाल्यास ते बदलण्याची जबाबदारीही महावितरणचीच असते. काही विशिष्ट दुरुस्तीच्या प्रकरणांमध्ये नाममात्र शुल्क आकारले जाऊ शकते. सर्व स्मार्ट मीटर अधिकृत तपासणी केंद्रांमध्ये पडताळणी केल्यानंतरच बसविण्यात येतात.
नवीन स्मार्ट मीटरमध्ये पूर्वीच्या मीटरच्या तुलनेत मूलभूत कार्यपद्धतीत मोठा बदल नसून, ऑनलाइन माहिती अद्ययावत करण्यासाठी त्यामध्ये सीमकार्डचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे हे मीटर अधिक अचूक, सुरक्षित आणि पारदर्शक असल्याचा दावा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केला आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु