
लातूर, 01 जुलै (हिं.स.) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येणाऱ्या मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण–2026 कार्यक्रमाच्या अनुषंगाने लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बीएलए) यांची बैठक नवीन जिल्हाधिकारी कार्यालयातील डी.पी.सी. हॉल येथे पार पडली.
या बैठकीचे अध्यक्षस्थान मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांनी भूषवले. बैठकीस नायब तहसीलदार (निवडणूक) अर्चना मैंदर्गी उपस्थित होत्या.
बैठकीत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण–2026 कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत राबविण्यात येणारी घरभेट मोहीम तसेच बीएलए-1 आणि बीएलए-2 यांच्या भूमिका व जबाबदाऱ्या याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. मतदार यादीची अचूकता, पारदर्शकता आणि सर्वसमावेशकता सुनिश्चित करण्यावरही भर देण्यात आला.
यावेळी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांनी सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि बीएलए यांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन केले.
बैठकीच्या शेवटी उपस्थित प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन प्रशासनाकडून करण्यात आले. तसेच कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही सर्व प्रतिनिधींनी दिली.
--------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis