समाजाला प्रशिक्षित समुपदेशकांची नितांत आवश्यकता; मान्यवरांनी व्यक्त केले मत
परभणी, 01 जुलै (हिं.स.) - वाढत्या ताण-तणाव, नैराश्य, चिंता आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर समाजाला प्रशिक्षित समुपदेशकांची नितांत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन मान्यवरांनी केले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU), नाश
अ


परभणी, 01 जुलै (हिं.स.) - वाढत्या ताण-तणाव, नैराश्य, चिंता आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर समाजाला प्रशिक्षित समुपदेशकांची नितांत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन मान्यवरांनी केले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU), नाशिक आणि राजयोग एज्युकेशन अँड रिसर्च फाऊंडेशन (शिक्षा प्रभाग), माऊंट आबू यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या ‘अँडव्हान्स डिप्लोमा इन कौन्सिलिंग अँड मेंटल हेल्थ’ अभ्यासक्रमातील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव, प्रमाणपत्र वितरण व विद्यार्थी सन्मान सोहळा ब्रह्माकुमारीज, ओम निवास, वसमत रोड, परभणी येथे उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजयोगिनी बी.के. अर्चना दीदी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून बी.के. सीमा दीदी, प्रा. बी.के. विकास एल. साळुंखे, डॉ. जगदीश नाईक, विजय मोरे, सुरेंद्र पाथ्रीकर आणि प्रा. सतीश भदाणे उपस्थित होते.

यावेळी २२ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच तीन विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात, व्यावसायिक आयुष्यात आणि समाजसेवेच्या कार्यात झालेल्या सकारात्मक बदलांचे अनुभव कथन केले. मानसिक स्थैर्य, मनःशांती आणि समाजहितासाठी समुपदेशक म्हणून कार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

रजिस्ट्रार विजय मोरे यांनी हा अभ्यासक्रम केवळ पदवीपुरता मर्यादित नसून जीवनाला सकारात्मक दिशा देणारा असल्याचे सांगितले. वरिष्ठ पत्रकार सुरेंद्र पाथ्रीकर यांनी आजच्या स्पर्धात्मक आणि धकाधकीच्या जीवनात कौन्सिलिंग शिक्षणक्रम ही काळाची गरज असल्याचे नमूद केले. प्रा. सतीश भदाणे यांनी मूल्यशिक्षणासोबत प्रशिक्षित समुपदेशकांची आवश्यकता अधोरेखित केली.

YCMOU चे नोडल अधिकारी प्रा. बी.के. विकास एल. साळुंखे यांनी कौन्सिलिंग क्षेत्रातील करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन करत ‘3C – Checking, Catching आणि Changing’ हे सूत्र समुपदेशकांनी आत्मसात करण्याचे आवाहन केले.

अध्यक्षीय भाषणात बी.के. अर्चना दीदी यांनी समुपदेशकाचे कार्य म्हणजे समोरच्या व्यक्तीला संवेदनशीलपणे ऐकून त्याच्या मनाला योग्य दिशा देणे होय, असे सांगितले. राजयोग ध्यानामुळे मानसिक स्थैर्य, आत्मविश्वास आणि अंतर्मनाची शक्ती वाढते, असेही त्यांनी नमूद केले. बी.के. सीमा दीदी यांनी आत्महत्या, नैराश्य आणि मानसिक तणावाच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर समुपदेशक घरोघरी ही संकल्पना काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे ब्रह्माकुमारीज, ओम निवास, वसमत रोड, परभणी येथे प्रशिक्षित समुपदेशकांमार्फत विनामूल्य ‘आध्यात्मिक समुपदेशन केंद्र’ सुरू करण्यात आले. या केंद्रात ताण-तणाव, चिंता, नैराश्य, झोपेच्या समस्या, एकाग्रतेचा अभाव, आत्मविश्वासाची कमतरता, कौटुंबिक मतभेद आदी मानसिक समस्यांवर गोपनीय आणि विश्वासार्ह मनोवैज्ञानिक व आध्यात्मिक समुपदेशन उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच राजयोग ध्यानाद्वारे मानसिक सक्षमीकरण व सकारात्मक जीवनशैलीसाठी मार्गदर्शन केले जाणार आहे.

नागरिकांनी आवश्यकतेनुसार ७०८३३१४८३२ या क्रमांकावर संपर्क साधून या विनामूल्य सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्रभा अंतवाल यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. बी.के. तांदळे यांनी केले. यावेळी नवीन प्रवेश प्रक्रियेची माहिती देण्यात आली. ज्ञानगंगा घरोघरी सोबत आता समुपदेशक घरोघरी हा संदेश देत मानसिकदृष्ट्या सशक्त, आनंदी आणि निरोगी समाज घडविण्यासाठी प्रशिक्षित समुपदेशकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे अधोरेखित करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande