पुणे मेट्रोचा विस्तार वेगात; वनाज–चांदणी चौक मार्गावर दुहेरी उड्डाणपूल
पुणे, 01 जुलै (हिं.स.)। पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला मेट्रोची थेट जोडणी देणाऱ्या कल्याणीनगर ते पुणे विमानतळ या नव्या मेट्रो मार्गाला अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. तसेच वनाज ते चांदणी चौक या विस्तारित मेट्रो मार्गावरील पौड रस्त्याची वाहतूक कोंडी कम
Metro Train


पुणे, 01 जुलै (हिं.स.)। पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला मेट्रोची थेट जोडणी देणाऱ्या कल्याणीनगर ते पुणे विमानतळ या नव्या मेट्रो मार्गाला अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. तसेच वनाज ते चांदणी चौक या विस्तारित मेट्रो मार्गावरील पौड रस्त्याची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कचरा डेपोपासून वनदेवी मंदिरापर्यंत मेट्रोसह दुहेरी उड्डाणपूल उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे मेट्रो आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त समन्वयातून राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मेट्रो भवन येथे बैठक झाली. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, महामेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ, विनोदकुमार अग्रवाल तसेच शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर उपस्थित होते.

बैठकीत वनाज–चांदणी चौक मेट्रो मार्गाच्या सुधारित आराखड्याबाबत चर्चा करण्यात आली. पौड फाट्यापासून वारजेच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर पूर्वी केवळ पौड फाटा ते कर्वे पुतळा या टप्प्यात वाहनांसाठी उड्डाणपूल प्रस्तावित होता. मात्र, आता हा आराखडा बदलून कचरा डेपोपासून वनदेवी मंदिरापर्यंत मेट्रोसह दुहेरी उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी सुधारित आराखडा तातडीने तयार करण्याच्या सूचना मंत्री मोहोळ यांनी मेट्रो प्रशासनाला दिल्या आहेत.

या दुहेरी उड्डाणपूलामुळे पौड रस्ता आणि वारजेकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक कोंडीत मोठी घट होण्याची अपेक्षा आहे. विशेषतः डेक्कनहून वारजेच्या दिशेने प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार असून या मार्गावरील पाच प्रमुख सिग्नल चौक वाहतूक कोंडीमुक्त होण्यास मदत होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande