
सोलापूर, 01 जुलै, (हिं.स.)। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारी पायी पालखी सोहळ्यात रथाला बैलजोड सेवा देण्यावरून सुरू असलेला वाद अखेर सामोपचाराने मिटला आहे. बैलजोड निवड समितीने एकाच रानवडे परिवारातील तिन्ही अर्जदारांना पुणे, सातारा आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांसाठी सेवा करण्याची संधी देण्याचा निर्णय घेतल्याने अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर पडदा पडला आहे.
निर्णयानुसार, पुणे जिल्ह्यासाठी हर्षवर्धन रानवडे, सातारा जिल्ह्यासाठी उमेश रानवडे आणि सोलापूर जिल्ह्यासाठी तुळशीराम रानवडे हे बैलजोड सेवा देणार आहेत. पालखी सोहळ्याची परंपरा, मानकरी कुटुंबाचा सन्मान आणि वारकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन समितीने सेवा तीनही जिल्ह्यांमध्ये विभागून देण्याचा मार्ग स्वीकारला.
या वादावर तोडगा काढण्यासाठी आळंदी देवस्थानाने पुढाकार घेत सलग सात तास बैठक घेतली. बैठकीदरम्यान दोन्ही बाजूंमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. मात्र, दीर्घ चर्चेनंतर सर्वांना मान्य होईल असा सुवर्णमध्य काढण्यात आला.
या निर्णयाचे रानवडे परिवारातील तिन्ही मानकऱ्यांनी स्वागत केले असून, यापूर्वी देवस्थानाशी झालेला पत्रव्यवहार, न्यायालयीन लढा आणि देवस्थानाला बजावलेली कायदेशीर नोटीस मागे घेण्याचा निर्णयही त्यांनी जाहीर केला आहे.
वाद सामोपचाराने मिटल्याने आळंदी परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. त्यामुळे यंदाच्या आषाढी पालखी सोहळ्याचा मार्ग अखेर निर्विघ्न झाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड