
छत्रपती संभाजीनगर, 01 जुलै (हिं.स.)। अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील नवउद्योजकांना उद्योग व्यवसायासाठी आर्थिक बळ मिळावे, या उद्देशाने राज्य शासनामार्फत 'मार्जिन मनी योजना' राबविण्यात येत आहे. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी पात्र लाभार्थ्यांकडून विहित नमुन्यात प्रस्ताव मागविण्यात येत असून, इच्छुकांनी तीन प्रतींमध्ये प्रस्ताव सnहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांच्या कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त गीता गुठ्ठे यांनी केले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त केंद्र शासनाने सुरू केलेल्या स्टँड अप इंडिया योजनेला पूरक म्हणून राज्य शासनाने ही योजना कार्यान्वित केली आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील नवउद्योजकांना प्रकल्पासाठी आवश्यक असलेली मार्जिन मनी भरण्यात अडचण येऊ नये, यासाठी लाभार्थी हिस्स्यातील १५ टक्के रक्कम राज्य शासनामार्फत उपलब्ध करून दिली जाते.
या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी प्रकल्पाच्या एकूण किंमतीपैकी १० टक्के स्वहिस्सा भरल्यानंतर आणि बँकेने स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत ७५ टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित १५ टक्के मार्जिन मनी राज्य शासनाकडून देण्यात येते. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती अथवा नवबौद्ध घटकातील सवलतीस पात्र असणे आवश्यक आहे. अर्जासोबत आयुक्त, समाज कल्याण, पुणे यांच्या नावे विहित नमुन्यात मागणीपत्र, उद्योग आधार नोंदणी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, बँकेचे कर्ज मंजुरीपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच बँक कर्ज खात्याचे विवरणपत्र जोडणे आवश्यक आहे.
हिंगोली जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील पात्र नवउद्योजकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यात प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांच्या कार्यालयात तात्काळ सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त गीता गुठ्ठे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis