
सोलापूर, 01 जुलै (हिं.स.)। सोलापूर शहरातील पाणीपुरवठा, ई-बस सेवा आणि पाकणी जलशुद्धीकरण प्रकल्पासह विविध विकासकामांना गती देण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बुधवारी मुंबईत वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठका घेतल्या. पावसाळी अधिवेशनाच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत त्यांनी शहराच्या प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेतला. यावेळी आमदार देवेंद्र कोठे उपस्थित होते.
नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंद राज यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सोलापूर शहरासाठी प्रस्तावित १,४०० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेण्यात आला. जागतिक बँकेकडे अंतिम मंजुरीसाठी असलेल्या या योजनेतील तांत्रिक त्रुटींवर चर्चा करण्यात आली. आवश्यक पूर्तता करून १५ जुलैपूर्वी महाराष्ट्र शासनाकडून प्रशासकीय मंजुरी दिली जाईल, असे आश्वासन डॉ. गोविंद राज यांनी दिले.
बैठकीत सोलापूरसाठी केंद्र शासनाने मंजूर केलेल्या १०० ई-बस सेवेलाही गती देण्याबाबत चर्चा झाली. कंपनीशी करार आणि वाहनतळाचे काम पूर्ण झाले असूनही बस उपलब्ध होण्यास होत असलेल्या विलंबाबाबत पालकमंत्री गोरे आणि आमदार कोठे यांनी पाठपुरावा केला. यावेळी अप्पर मुख्य सचिवांनी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून १५ ऑगस्टपूर्वी किमान २५ ई-बस सोलापूरला उपलब्ध करून दिल्या जातील, असे आश्वासन दिले.
याशिवाय, पाकणी येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या प्रस्तावातील त्रुटी दूर करून तो केंद्र सरकारकडे पाठविण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. या प्रकल्पाला केंद्र सरकारची मंजुरी लवकर मिळावी, यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्याची विनंती पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी केली.
यावर सकारात्मक प्रतिसाद देत नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंद राज यांनी सोलापूर शहरातील प्रलंबित विकासकामे आणि महत्त्वाचे प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड