
लातूर, 01 जुलै (हिं.स.)।
मुबलक स्वरूपात तसेच पेरणी योग्य पाऊस झाल्याने जळकोट तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणीला प्रारंभ केला आहे. सोयाबीन व कापूस यांची लागवड केली जात असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील शेत शिवारात सर्वत्र पेरणीची लगबग सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे.
जळकोट तालुक्यात एकूण ३४ हजार हेक्टर क्षेत्र असून यापैकी २५ हजार हेक्टर क्षेत्र पेरणी योग्य आहे. शेतकऱ्यांची अर्थवाहिनी व मुख्य पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते. सोयाबीनचा पेरा जवळपास १५ हजार हेक्टर्स क्षेत्रामध्ये होण्याची शक्यता आहे. उर्वरित क्षेत्रामध्ये कापूस, हायब्रीड, तूर, ज्वारी, उडीद, मूग हे कडधान्य पेरले जाणार आहे. मुबलक पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे. शेतकऱ्यांनी जरी चाड्यावर मूठ धरली असली तरी आता सर्वत्र यांत्रिकीकरणामुळे ट्रॅक्टरने पेरणी सुरू आहे.
प्रचंड पाऊस झाल्याने अद्यापही काही शेतात वाफसा नसल्याने तिफन चालत नाही व ट्रॅक्टर ही चालत नाही. शेतकरी महागा मोलाचे बी बियाणे व रासायनिक खते खरेदी करुन काळ्या आईची ओटी भरत आहेत. मागच्या वर्षी अतिवृष्टी होऊन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यावर्षी शेतकऱ्यांची मदार पूर्णतः खरीप पिकावर आहे.
नदी दी नाल्यांनानाल्यांना विहिरींना पाणी आले आहे. पाझर तलावात काही ठिकाणी ५०
टक्के तर काही ठिकाणी ८० टक्के पाणी भरले आहे. शिवारामध्ये जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जास्तीचा पेरा सोयाबीनचा असल्याने सर्व लक्ष शेतकऱ्यांनी सोयाबीनवर केंद्रित केले आहे. २२ जूनच्या पावसाने शेतातील एकाची माती एकाच्या शेतात करून टाकली आहे. नदीकाठीच्या अनेक शेतात दगड मातीचे थर साचले असल्याने ते शेतकरी हातबल झाले आहेत.
औसा तालुक्यात दमदार पावसाची प्रतिक्षा
जून महिना संपला तरी औसा तालुक्यावर वरुणराजाची कृपादृष्टी झालेली नाही. संपूर्ण जून महिन्यात सर्वात जास्त पावसाच्या दिवसात अवघ्या चार दिवसच पावसाने हजेरी लावली असून, सरासरीच्या केवळ 43 टक्के पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. परिणामी भूजल पातळी झपाट्याने घसरली असून तालुक्यातील 27 गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या गावांना अधिग्रहित पाणीपुरवठा सुरू असतानाच, दुसरीकडे तब्बल 74 हजार हेक्टरवरील खरीप पेरण्या पावसाअभावी पूर्णपणे खोळंबल्या आहेत. त्यामुळे शेतकरी आता आभाळाकडे आशेने डोळे लावून बसले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis