परभणी जिल्ह्यात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणास प्रारंभ
परभणी, 01 जुलै (हिं.स.) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार परभणी जिल्ह्यात सोमवार पासून मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. या मोहिमेंतर्गत २९ जुलै या कालावधीत बूथस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी जाऊन मतदारांची माहित
Q


परभणी, 01 जुलै (हिं.स.) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार परभणी जिल्ह्यात सोमवार पासून मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. या मोहिमेंतर्गत २९ जुलै या कालावधीत बूथस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी जाऊन मतदारांची माहिती पडताळून पाहणार आहेत. बीएलओ भेटीदरम्यान आपणास दिलेला गणना अर्ज आवश्यक माहिती भरून स्वाक्षरीसह परत द्यावा व पोच घेऊन अर्जाची एक प्रत स्वतःकडे सुरक्षित ठेवावी. तरी मतदारांनी बीएलओंना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नतिशा माथुर यांनी केले आहे.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार, नायब तहसिलदार सतीश रेड्डी, सहायक महसूल अधिकारी दत्ता गिणगिने आदींसह पत्रकार उपस्थित होते. प्रारंभी उपजिल्हाधिकारी संगेवार यांनी मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली. मतदारांनी बीएलओ घरी येण्यापूर्वी voters.eci.gov.in संकेतस्थळ किंवा ECINet App वर जाऊन २००२ च्या विशेष सखोल पुनरीक्षणातील स्वतःचा किंवा आई-वडिलांचा तपशील (नाव, मतदारसंघ, भाग क्रमांक, अनुक्रमांक) तपासून ठेवावा. त्यामुळे पडताळणी प्रक्रिया अधिक जलद व सुलभ होईल.

-पुनरिक्षणासाठी वैध प्रमाणपत्र ?

ज्या नागरिकांचे किंवा त्यांच्या आई-वडिलांचे नाव मागील विशेष सखोल पुनरीक्षणमध्ये नोंदलेले नसेल, त्यांनी पुढीलपैकी कोणतेही एक कागदपत्र पुरावा म्हणून तयार ठेवावा. यामध्ये जन्माचा दाखला, पासपोर्ट, दहावीचे गुणपत्रक किंवा शैक्षणिक प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, सरकारी किंवा सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी ओळखपत्र, राज्य अथवा स्थानिक प्राधिकरणाची कुटुंब नोंदवही, शासनाने दिलेल्या जमीन किंवा घर वाटपाचे प्रमाणपत्र, वनहक्क प्रमाणपत्र, राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा पुरावा तसेच बँक, टपाल, जीवन विमा महामंडळ किंवा सरकारने १ जुलै १९८७ पूर्वी दिलेले ओळखपत्र अथवा प्रमाणपत्र तसेच आधार कार्ड ओळखपत्र पुरावा म्हणून स्वीकारले जाणार आहे.

-१६०० हुन अधिक बीएलओंची नियुक्ती

मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने परभणी जिल्ह्यातील जिंतूर, परभणी, गंगाखेड आणि पाथरी या चार विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण १ हजार ६२३ मतदान केंद्रांतंर्गत १ हजार ६२३ बीएलओ असणार आहेत. १६३ बीएलओ पर्यवेक्षक आणि १३६ सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. या यंत्रणेमार्फत जिल्ह्यातील १५ लाख ४१ हजार ७ मतदारांची सखोल पडताळणी करण्यात येणार आहे.

-आतापर्यंत १३ लाख मतदारांचे मँपिंग

आतापर्यंत झालेल्या मॅपिंगनुसार १३ लाख ५५ हजार ८८६ (८७.९९ टक्के) मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले असून २ लाख ६२ हजार ७७७ (१९.३८ टक्के) अनोमली (त्रुटी) आढळल्या आहेत. तसेच ७० हजार २८८ नोंदी छायाचित्र समान असलेल्या आहेत आणि ३८ हजार १०१ नॉन-स्टँडर्ड फोटो असलेल्या मतदारांची माहिती प्राप्त झालेली आहे. विशेष सखोल पुनरीक्षणासाठी १ ऑक्टोबर ही अर्हता तारीख निश्चित करण्यात आली आहे. तयारी, प्रशिक्षण व छपाईचे काम पूर्ण झाले असून ३० जून ते २९ जुलै या कालावधीत बीएलओ घराघरात भेट देऊन मतदारांची माहिती पडताळणी करणार आहेत. यानंतर २९ जुलैपर्यंत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण, ५ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादीचे प्रकाशन, ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. ५ ऑगस्ट ते ३ ऑक्टोबर दरम्यान दावे-हरकतींची सुनावणी व निकाली काढण्याची प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर ७ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, बीएलओ घरपोच आल्यानंतर आवश्यक माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून देऊन मतदार यादी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेत सहकार्य करावे. अचूक व त्रुटीमुक्त मतदार यादी ही सशक्त लोकशाहीची पायाभरणी असल्याने प्रत्येक पात्र मतदाराने या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी नतिशा माथुर यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande