
परभणी, 01 जुलै (हिं.स.)। परभणी ते मानवत या महामार्गावरील कोल्हा येथील रेल्वे उड्डाणपुलावर कार आणि आयशर या दोन वाहनांच्या जोरदार धडकेत कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना बुधवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास घडली.
मानवत तालुक्यातील खरबा येथील ज्ञानेश्वर वैजनाथ निर्मळ व गणेश तानाजी निर्मळ हे दोघे युवक एम.एच.06 बी.एम. 6110 या क्रमांकाच्या इर्टिका कारमधून जात होते. त्यावेळी कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे कार उड्डाणपुलाच्या कठड्यावर आदळली आणि त्या पाठोपाठ समोरुन येणार्या एम.एच.26 ए.डी. 1401 या आयशर वाहनावर धडकली. त्यात दोघेही जागीच मृत्यू पावले. कारमधील कोल्हा येथील दिनेश भिसे, मुंजाभाऊ भिसे, पुरुषोत्तम तारे, मधुकर ढाकरगे, युवराज भिसे, योगेश फड यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन कारमधून त्या दोघांना कसबसे बाहेर काढले. मानवत पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अनिल खिल्लारे, शितल बोर्डे, राजू इंगळे, प्रकाश खंदारे, अविनाश डंबाळे यांच्यासह अन्य पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांनी पंचनामा केला.
दरम्यान, या घटनेत मृत्यू पावलेले दोघेही तरुण पालकांचे एकुलते एक चिरंजीव होते. गणेश तानाजी निर्मळ हे विवाहित होते. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis