
मनरेगाला पर्याय! आता १२५ दिवस रोजगार हमी
ग्रामीण रोजगाराला नवी दिशा; लातूरात जिल्हास्तरीय कार्यक्रम
रोजगार हमी वाढली; १०० ऐवजी १२५ दिवस काम
लातूर, 01 जुलै (हिं.स.)।
भारत सरकारने मंजूर केलेला ‘विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण)’ अर्थात VB-G RAM-G अधिनियम २०२५ राज्यात १ जुलै २०२६ पासून लागू करण्यात आला असून, या नव्या योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ २ जुलै रोजी सकाळी ११ वाजता लातूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील डीपीडीसी हॉल येथे होणार आहे. हा कायदा पूर्वीच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम (मनरेगा) ऐवजी लागू होत आहे.
या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे. तसेच बचत गटातील महिला सदस्य, योजनेचे लाभार्थी, ग्रामीण कामगार युवक आणि ग्रामपंचायत प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमादरम्यान या नव्या योजनेची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पोस्टर्स, बॅनर्स आणि माहिती पुस्तिकांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. यामधून योजनेची वैशिष्ट्ये आणि लाभ नागरिकांना समजावून सांगितले जाणार आहेत.
१०० ऐवजी आता १२५ दिवस रोजगाराची हमी
या नव्या कायद्यांतर्गत ग्रामीण मजुरांना पूर्वीच्या मनरेगा योजनेतील १०० दिवसांऐवजी तब्बल १२५ दिवस रोजगाराची वैधानिक हमी मिळणार आहे. हा या कायद्यातील सर्वात महत्त्वाचा बदल मानला जात आहे.
सध्या मनरेगा अंतर्गत सुरू असलेली सर्व कामे पूर्ववत सुरू राहणार असून ती पूर्ण केली जाणार आहेत. मात्र, १ जुलैनंतरची नवीन विकासकामे नव्या कायद्याच्या नियमांनुसार हाती घेतली जातील.
जिल्हा प्रशासनाने या महत्त्वपूर्ण बदलाचे स्वागत करत सर्व संबंधित घटकांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis