
सोलापूर, 01 जुलै (हिं.स.)। माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी विभाग, महाराष्ट्र शासन, आत्मा सोलापूर आणि जिल्हा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात प्रगतशील शेतकरी, पीक स्पर्धेतील विजेते आणि विविध कृषी योजनांतील लाभार्थी शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती रामप्पा चिवडाशेट्टी, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ॲड. अमृता वाघे, जिल्हा परिषद सदस्य तसेच कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आत्मा सोलापूरचे प्रकल्प संचालक कांताप्पा खोत यांनी कृषी दिनाचे महत्त्व आणि कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.
यावेळी राज्य, जिल्हा आणि तालुकास्तरीय पीक स्पर्धेत यश मिळविलेल्या शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी स्वावलंबन योजना अंतर्गत लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांचाही गौरव करण्यात आला. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना वृक्षरोप, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी प्रगतशील शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करून इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले. तर कृषी विज्ञान केंद्राचे विषयतज्ज्ञ अमोल शास्त्री यांनी 'एल निनो काळातील आपत्कालीन पीक व्यवस्थापन, सोयाबीन व तूर लागवडीची पंचसूत्री आणि खरीप हंगामाचे नियोजन' या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी शासनाच्या कृषी योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ॲड. अमृता वाघे यांनी, “एक राजा राज्य चालवतो, पण एक शेतकरी संपूर्ण देश चालवतो,” असे सांगत शेतकऱ्यांच्या योगदानाचा गौरव केला.
समारोपाच्या भाषणात जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांनी, “मी स्वतः एक शेतकरी आहे. शेतकऱ्यांच्या कष्टांची आणि समस्यांची मला जाणीव आहे. शेतकरी समृद्ध झाला तरच देशाची खरी प्रगती होईल. जिल्हा परिषद शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध राहील,” असे प्रतिपादन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड