पालखी मार्गावरील वाहतुकीचे नियोजन जाहीर; दिवेघाट, बोपदेव घाट मार्ग बंद
पुणे, 01 जुलै, (हिं.स.)। श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे ८ जुलै रोजी श्रीक्षेत्र आळंदी येथून प्रस्थान होणार असून, पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण हद्दीत ११ ते १५ जुलैदरम्यान विशेष बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. या काळात प
Wari


पुणे, 01 जुलै, (हिं.स.)। श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे ८ जुलै रोजी श्रीक्षेत्र आळंदी येथून प्रस्थान होणार असून, पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण हद्दीत ११ ते १५ जुलैदरम्यान विशेष बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. या काळात पालखी मार्गावरील वाहतुकीत बदल करून वाहने पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जारी केले आहेत.

११ जुलै रोजी पहाटे २ वाजल्यापासून १३ जुलै रोजी रात्री १२ वाजेपर्यंत पुण्याकडून सासवडकडे दिवेघाट व बोपदेव घाटमार्गे जाणारी सर्व वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. या मार्गावरील वाहने खडीमशिन चौक–कात्रज–कापूरहोळ मार्गे वळविण्यात येणार आहेत. तर सासवडकडून पुण्याकडे येणारी वाहतूक गराडे–खेड–शिवापूर मार्गे वळविण्यात येईल.

१३ जुलै रोजी पहाटे २ वाजल्यापासून १४ जुलै रोजी रात्री १२ वाजेपर्यंत पुणे–सासवड–जेजुरी–वाल्हे–निरा तसेच निरा–पुणे या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. या कालावधीत वाहनचालकांनी झेंडेवाडी–पारगाव मेमाणे–सुपे–मोरगाव–निरा या मार्गाचा वापर करावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांची मोठी गर्दी अपेक्षित असल्याने नागरिकांनी वाहतुकीतील बदल लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे आणि प्रशासनाने सुचविलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande