पुणे महापालिकेचा मोठा निर्णय; महिलांच्या निवासी मिळकतींना ५० टक्के मिळकतकर सवलतीला मंजुरी
पुणे, १ जुलै (हिं.स.) : महापालिका हद्दीतील महिलांच्या नावावर असलेल्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या निवासी मिळकतींना मिळकतकरात ५० टक्के सवलत देण्याच्या प्रस्तावाला पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे. अंतिम मान्यतेसाठी हा प्रस्ताव राज्य
pmc


पुणे, १ जुलै (हिं.स.) : महापालिका हद्दीतील महिलांच्या नावावर असलेल्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या निवासी मिळकतींना मिळकतकरात ५० टक्के सवलत देण्याच्या प्रस्तावाला पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे. अंतिम मान्यतेसाठी हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार असून, मंजुरीनंतर त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. या निर्णयामुळे शहरातील हजारो महिला मिळकतदारांना आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम १४०-अ आणि १४०-ब अंतर्गत असलेल्या करसवलतीच्या तरतुदींनुसार हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मात्र, या योजनेचा लाभ काही अटी व शर्तींच्या अधीन राहणार आहे.

या योजनेचा लाभ ३१ मार्च २०२५ पर्यंत महिलांच्या नावावर नोंद असलेल्या निवासी मिळकतींनाच मिळणार आहे. तसेच, ज्या मिळकतधारकांकडे १ एप्रिल २०२६ पूर्वीची मिळकतकराची थकबाकी, व्याज, दंड किंवा शास्ती बाकी असेल, त्यांना या सवलतीचा लाभ मिळणार नाही.

अनधिकृत मिळकतींवरील शास्ती पूर्ववत कायम राहणार असून, संबंधित प्रकरणांमध्ये महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम २६७(अ) मधील नियम लागू राहतील. तसेच, ज्या मिळकतींना सध्या ४० टक्के करसवलत मिळत आहे, त्यांना नव्या योजनेअंतर्गत ५० टक्क्यांऐवजी २५ टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

राज्य सरकारची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असून, शहरातील हजारो महिला मिळकतदारांना त्याचा थेट लाभ होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande