
पुणे, १ जुलै (हिं.स.) : पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला गती मिळाली असून, त्याअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या एरोसिटीसाठी २५३ हेक्टर जमिनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना एरोसिटीमध्ये परतावा देण्यासाठी चार गावांतील जमीन संपादित करण्यात येणार असून, त्यासाठी प्रतिएकर १ कोटी ५१ लाख रुपये मोबदला निश्चित करण्यात आला आहे.
विमानतळ प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या एकूण १,२१६ हेक्टर जमिनीपैकी आतापर्यंत ९१० हेक्टर (सुमारे २,३०० एकर) जमीन देण्यास प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी संमती दर्शविली आहे. त्यामुळे या जमिनीचा ताबा जिल्हा प्रशासनाकडे हस्तांतरित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जमीन संपादनाच्या मोबदल्यापोटी प्रशासनाने आतापर्यंत शेतकऱ्यांना सुमारे १,१५० कोटी रुपये वितरित केले आहेत. उर्वरित मोबदल्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) कडे आणखी १,००० कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली असून, हा निधी लवकरच उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, सुमारे ३०० हेक्टर क्षेत्राच्या करारनाम्यांची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. ही प्रक्रिया गतीने पूर्ण करण्यासाठी तीनही भूसंपादन अधिकारी सासवड येथे तळ ठोकून कार्यरत आहेत. येत्या १५ ऑगस्टपर्यंत सर्व करारनामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने निश्चित केले आहे.
विमानतळ प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या एकूण ६ हजार कोटी रुपयांच्या निधीची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी राज्य शासन आणि संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला वेग आल्याने पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु