
पुणे, 01 जुलै (हिं.स.)। गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या मान्सूनने बुधवारी दुपारी पुण्यात दमदार पुनरागमन केले. अचानक सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील जनजीवन काही काळ विस्कळीत झाले, तर रस्त्यांवर वाहनधारक आणि नागरिकांची तारांबळ उडाली.
पुणे शहरासह उपनगरांमध्ये दुपारनंतर पावसाचा जोर वाढला. पाषाण, कोथरूड, शिवाजीनगर, औंध, हडपसर या भागांसह उरुळी देवाची, फुरसुंगी, मांजरी आणि लोणीकाळभोर परिसरात जोरदार सरी कोसळल्या. काही दिवसांपासून शहरात केवळ हलक्या स्वरूपाचा पाऊस होत असल्याने पुणेकर दमदार पावसाच्या प्रतीक्षेत होते. अखेर बुधवारी झालेल्या जोरदार पावसाने उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला.
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) पुढील काही दिवस पुणे शहर आणि परिसरात पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हवामान विभागाने पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील घाट परिसरासाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. लोणावळा, महाबळेश्वर तसेच पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी आणि पर्यटकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु