सोलापूर - नाल्यांच्या आराखड्यावर नागरिकांच्या सूचना घ्या; नरेंद्र काळे यांची मागणी
सोलापूर, 01 जुलै (हिं.स.)। पहिल्याच दमदार पावसाने सोलापूर शहरातील पावसाळापूर्व तयारीचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. शहरातील अनेक भागांत पाणी तुंबणे, नाले ओसंडून वाहणे आणि घरांमध्ये पाणी शिरण्याच्या घटना घडल्यानंतर महापालिका प्रशासनाच्या नि
smc


सोलापूर, 01 जुलै (हिं.स.)। पहिल्याच दमदार पावसाने सोलापूर शहरातील पावसाळापूर्व तयारीचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. शहरातील अनेक भागांत पाणी तुंबणे, नाले ओसंडून वाहणे आणि घरांमध्ये पाणी शिरण्याच्या घटना घडल्यानंतर महापालिका प्रशासनाच्या नियोजनावर सत्ताधारी भाजपसह काँग्रेसनेही जोरदार टीका केली आहे.

या प्रश्नावर बोलताना सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी, पावसाळ्यापूर्वी आवश्यक नियोजन करण्याऐवजी प्रशासनाने नेमके काय केले, असा सवाल उपस्थित केला. शहरातील ७४ नाल्यांसाठी तयार करण्यात आलेल्या पर्जन्यजल नियंत्रण आणि आपत्ती व्यवस्थापन आराखड्यावर नागरिकांच्या हरकती व सूचना मागविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. लोकसहभागातून आराखड्यात आवश्यक सुधारणा झाल्यास भविष्यातील समस्या टाळता येतील, असेही त्यांनी नमूद केले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजयकुमार हत्तुरे यांनीही प्रशासनाच्या कारभारावर टीका करत, नैसर्गिक नाल्यांवरील अतिक्रमणामुळेच शहरात जलकोंडीची समस्या निर्माण होत असल्याचा आरोप केला. या अतिक्रमणांवर प्रभावी कारवाई केल्याशिवाय पावसाळ्यातील समस्या सुटणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, शहरातील पावसाळी पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी महापालिकेने शहरातील ७४ नाल्यांचा पर्जन्यजल नियंत्रण व आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. या आराखड्याला महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी सक्षम मंजुरी दिली आहे.

मात्र, आराखड्याच्या अंमलबजावणीदरम्यान संभाव्य अडचणी टाळण्यासाठी नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागवून त्यांचा विचार करावा, अशी मागणी लोकप्रतिनिधींकडून करण्यात येत आहे. पहिल्याच पावसात शहरातील परिस्थिती समोर आल्यानंतर महापालिका प्रशासनासमोर प्रभावी नियोजन आणि तातडीच्या उपाययोजनांचे आव्हान उभे ठाकले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande