भीमा नदीकाठी दुर्दैवी दुर्घटना; विजेच्या धक्क्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू
सोलापूर, 01 जुलै (हिं.स.)। पंढरपूर रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीवरील शेती पंपाची विद्युत मोटार बंद करण्यासाठी गेलेल्या शेतकरी पती-पत्नीचा विजेच्या तीव्र धक्क्याने जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना पंढरपूर तालुक्यातील आंबे येथे घड
भीमा नदीकाठी दुर्दैवी दुर्घटना; विजेच्या धक्क्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू


सोलापूर, 01 जुलै (हिं.स.)। पंढरपूर रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीवरील शेती पंपाची विद्युत मोटार बंद करण्यासाठी गेलेल्या शेतकरी पती-पत्नीचा विजेच्या तीव्र धक्क्याने जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना पंढरपूर तालुक्यातील आंबे येथे घडली. ऐन वटपौर्णिमेच्या दिवशी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

या दुर्घटनेत लक्ष्मण बाबू नागणे (वय ६०) आणि अलका लक्ष्मण नागणे (वय ५५) या शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, आंबे परिसरात शेती पंपाचा वीजपुरवठा पहाटे सुमारे ४.४५ वाजता सुरू झाला. रविवारी रात्रभर मुसळधार पाऊस झाल्याने भीमा नदीवरील विद्युत मोटार बंद करण्यासाठी लक्ष्मण नागणे पहाटेच्या सुमारास नदीकाठी गेले. पावसामुळे निर्माण झालेल्या विद्युत बिघाडामुळे मोटार बंद करत असताना त्यांना अचानक विजेचा तीव्र धक्का बसला.

पतीला विजेचा धक्का लागल्याचे पाहून अलका नागणे यांनी तत्काळ त्यांना वाचविण्यासाठी धाव घेतली. मात्र, परिसरात पाणी आणि ओलावा असल्याने वीजप्रवाह अधिक वेगाने पसरला आणि त्यांनाही विजेचा जोरदार धक्का बसला. त्यामुळे दोघेही जागीच कोसळले. या दुर्दैवी घटनेत काही क्षणांतच शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेनंतर गावात शोककळा पसरली असून, ऐन वटपौर्णिमेच्या दिवशी घडलेल्या या दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande