
सोलापूर, 01 जुलै (हिं.स.)। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीला वेग आला असून, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ७ हजार ६९४ शेतकरी कर्जदारांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड केली आहे. या यादीमध्ये मंगळवेढा तालुक्यातील सर्वाधिक १,५७९ शेतकऱ्यांचा समावेश असल्याने या तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.
सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयाने योजनेची प्रभावी, पारदर्शक आणि वेळेत अंमलबजावणी व्हावी, यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला पात्र कर्जदारांची संपूर्ण माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार बँकेने सर्व पात्र कर्जदारांच्या खात्यांचा तपशील पोर्टलवर नोंदविला आहे.
बँकेकडून माहिती अपलोड करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता शासनस्तरावर पात्रतेची पडताळणी आणि पुढील कार्यवाही होणार आहे. यानंतर पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्याची प्रक्रिया गतीने पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड