सोलापूर - आंत्रोळी गावात स्वातंत्र्यसैनिक डॉ. कृष्णा आंत्रोळीकर यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण
सोलापूर, 12 जुलै (हिं.स.)सोलापूर जिल्ह्यातील आंत्रोळी गावातील स्वातंत्र्यसैनिक डॉ. कृष्णा (भाऊ काका) भीमराव आंत्रोळीकर यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात
सोलापूर - आंत्रोळी गावात स्वातंत्र्यसैनिक डॉ. कृष्णा आंत्रोळीकर यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण


सोलापूर, 12 जुलै (हिं.स.)सोलापूर जिल्ह्यातील आंत्रोळी गावातील स्वातंत्र्यसैनिक डॉ. कृष्णा (भाऊ काका) भीमराव आंत्रोळीकर यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. साने गुरुजी प्राथमिक विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात आयोजित कार्यक्रमात ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.यावेळी शहाजी पवार, शशिकांत चव्हाण, महानगरपालिका गटनेते नरेंद्र काळे, नगरसेविका रोहिणी तडवळकर, रामभाऊ तडवळकर, जिल्हा परिषद सदस्य सोनाली कडते, श्रीकांत येळेगावकर, मोहन आंत्रोळीकर यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, डॉ. कृष्णा आंत्रोळीकर हे केवळ आंत्रोळी गावाचे नव्हे, तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे भूषण आहेत. स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी दिलेले योगदान इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदले गेले असून त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे.ते म्हणाले, त्या काळात एमबीबीएस पदवी मिळवलेले डॉ. आंत्रोळीकर हे उच्चशिक्षित, दूरदृष्टीचे आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व होते. गरीब व सर्वसामान्य रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी असहकार आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आणि साधी राहणी, उच्च विचार या तत्त्वांचा आयुष्यभर पुरस्कार केला.पालकमंत्री गोरे यांनी सांगितले की, सोलापूरच्या चार हुतात्म्यांपैकी हुतात्मा कुर्बान हुसेन हे डॉ. आंत्रोळीकर यांचे शिष्य होते, तर इतर हुतात्म्यांशी त्यांचे घनिष्ठ मैत्रीचे संबंध होते. त्यामुळे स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान अधिक महत्त्वाचे ठरते.पुतळा उभारणीसाठी परिश्रम घेतलेल्या समितीचे कौतुक करत त्यांनी सांगितले की, डॉ. आंत्रोळीकर यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा अर्धपुतळा उभारण्यात आला आहे. या स्मारकामुळे नव्या पिढीला स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास आणि त्यागाची प्रेरणा मिळेल.ग्रामविकास मंत्री म्हणून आंत्रोळी गावाला ही आपली पहिलीच भेट असल्याचे सांगत पालकमंत्री गोरे यांनी ग्रामस्थांनी सादर केलेल्या निवेदनानुसार डॉ. आंत्रोळीकर यांच्या स्मरणार्थ प्रस्तावित विकासकामे लवकरच पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande