
पुणे, 14 जुलै (हिं.स.)। शहरातील प्रमुख चौक आणि गर्दीच्या रस्त्यांवर परवानगीशिवाय आंदोलन करण्यास आता मनाई करण्यात येणार आहे. तसेच सोशल मीडियावर आंदोलनाचे आवाहन, संदेश किंवा पोस्ट प्रसारित करण्यापूर्वी पोलिसांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा पुणे पोलिसांनी दिला आहे.
एफसी रोड, जेएम रोड, बालगंधर्व चौक, खंडोजीबाबा चौक, टिळक चौक तसेच नदीपात्र या शहरातील प्रमुख आणि वर्दळीच्या ठिकाणी आंदोलनांना परवानगी दिली जाणार नाही. आंदोलनांमुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊन सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
आंदोलन, मोर्चा, धरणे किंवा रास्ता रोको करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसराचा वापर करावा, तसेच रस्ते अडवून नागरिकांना वेठीस धरू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या काही ऑनलाइन परीक्षांना विरोध करत स्पर्धा परीक्षार्थींनी पारंपरिक पद्धतीने परीक्षा घेण्याच्या मागणीसाठी आंदोलनाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर स्पर्धापरीक्षार्थींच्या शिष्टमंडळाने सोमवारी पुणे पोलिस आयुक्तांची भेट घेतली.
या बैठकीत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आंदोलनाबाबत पोलिसांची भूमिका स्पष्ट केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून अचानक मोठ्या संख्येने नागरिकांना रस्त्यावर बोलावणे आणि वाहतूक व्यवस्था विस्कळीत करणे यापुढे सहन केले जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.
कोणतेही आंदोलन, मोर्चा, धरणे किंवा रास्ता रोको करण्यापूर्वी पोलिसांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु