
बीड, 12 जुलै (हिं.स.)। उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बीड नगर परिषदेच्या अमृत अभियान अंतर्गत पाणीपुरवठा व भुमिगत गटार योजनेसंदर्भात आढावा बैठक संपन्न झाली. सन २०१७ पासून रखडलेल्या या दोन्ही योजना नव्याने कार्यान्वित होण्याचा मार्ग आजच्या बैठकीमुळे सुकर झाला आहे.
सुमारे ११४.६३ कोटी रुपये किंमतीच्या पाणीपुरवठा योजनेचे प्रत्यक्ष काम न करता १०२.५७ कोटी रुपये कंत्राटदाराने उचल केली आहे. सुमारे १६५.८० कोटी रुपये किंमतीची भुयारी गटार योजनेत १७.५९ कोटी रुपये कंत्राटदारास अदा झालेले आहेत. अर्धवट अवस्थेत कामे असतानाही कामाचे कोणतेही मुल्यांकन अथवा चाचणी न घेता संगणमताने कोट्यावधी रुपयांचा शासन निधी कंत्राटदारास अदा झाल्यामुळे बीडकरांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
🔸 झालेल्या कामांचे मुल्यांकन करून जास्तीचा निधी उचल केल्याप्रकरणी जबाबदारी निश्चित करणार.
🔸 कंत्राटदारांची चौकशी करून त्यांना काळ्या यादीत टाकणार.
🔸 उर्वरित अपूर्ण कामांचे नव्याने अंदाजपत्रक तयार करून मान्यतेसाठी सादर करणार.
🔸 काडीवडगाव व ईट येथील जलशुध्दीकरण केंद्राच्या ठिकाणी आवश्यक विद्युतभार उपलब्ध करण्याच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करणार.
🔸 उद्भवाच्या ठिकाणी एक्सप्रेस फिडरद्वारे अखंडित विज पुरवठा करण्याच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करणार.
🔸 मौजे ईट जलशुध्दीकरण केंद्र येथील १ मे.वॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पाचे नेट मिटरींग करण्याच्या कामास मान्यता.
🔸 भुयारी गटार योजना व मलनिःसारण केंद्रासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याच्या महसुल विभागाला सूचना.
🔸 महावितरणच्या थकबाकी संदर्भात दंड व्याजाची रक्कम माफ करून मुळ देयक भरण्यासाठी टप्पे पाडून देणे व निधीची उपलब्धता या बाबत सविस्तर प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना.
🔸 दि.१४ जुलै रोजी नगरविकास विभागाचे मा. अप्पर मुख्य सचिव सर्व कामांचा प्रशासकीय पातळीवर आढावा घेणार.
उक्त मुद्यांच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री ना. श्रीमती सुनेत्रावहिणी अजित पवार यांनी बैठकीत सूचना देऊन आवश्यक निर्णय केले आहेत. बीड शहराच्या पाणी पुरवठा व स्वच्छतेच्या संदर्भात ही बैठक निर्णायक ठरली आहे. आजवर विविध कारणांमुळे रखडलेले विषय मार्गी लागले आहेत.
बैठकीला खा. बजरंग सोनवणे, नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव डॉ. राजेश देशमुख, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव अमगोथु श्रीरंगा नायक, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, नगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे, उपनगराध्यक्ष विनोद मुळूक, नगराध्यक्ष प्रतिनिधी मुजीब शेख, गटनेते फारुक पटेल, स्थायी समिती सदस्य अमर नाईकवाडे, सभापती निजाम शेख, नगरसेवक अशफाक इनामदार, मुख्याधिकारी विक्रम मांडुरके, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या मुख्य अभियंता मनिषा पलांडे, महावितरणचे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले यांच्यासह नगरविकास विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महावितरण, महसुल विभागातील वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis