
चंद्रपूर, 12 जुलै (हिं.स.)।
ब्रिक्स (BRICS) देशांतील मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने आज ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला (TATR) भेट दिली. सफारी दरम्यान प्रतिनिधींना अनेक वाघांचे दर्शन घडले आणि त्यांनी अविस्मरणीय वन्यजीव अनुभव घेतला.
७० सदस्यीय शिष्टमंडळाच्या सफरीसाठी कोलारा, मदनापूर आणि बेलारा बफर प्रवेशद्वारांवरून वीसहून अधिक सफारी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. परदेशी प्रतिनिधींनी मदनापूर प्रवेशद्वारातून व्याघ्र प्रकल्पात प्रवेश केला, तर इतर प्रतिनिधींनी बेलारा आणि कोलारा प्रवेशद्वारांमधून जंगल सफारीचा आनंद घेतला.
सकाळच्या सफारीदरम्यान रशिया आणि इथिओपियाच्या प्रतिनिधींना प्रसिद्ध T-178 वाघासह T-82 च्या बछड्याचे दर्शन झाले. सायंकाळच्या सफरीत दक्षिण आफ्रिका, इजिप्त आणि इराण येथील प्रतिनिधींनी T-178, T-82 चा बछडा तसेच TN-9 च्या बछड्याचे दर्शन घेतले.
वाघांच्या दर्शनाबरोबरच या प्रतिनिधींना पावसाळ्यामुळे हिरवाईने नटलेल्या जंगलात चितळ, सांबर, गवा, रानडुक्कर तसेच विविध पक्षी प्रजातींचेही दर्शन झाले. या समृद्ध जैवविविधतेने नटलेल्या जंगल सफारीचा अनुभव अत्यंत संस्मरणीय असल्याचे प्रतिनिधींनी सांगितले. तसेच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वैज्ञानिक व्यवस्थापन आणि संवर्धन पद्धतींचे त्यांनी विशेष कौतुक केले.
या दौऱ्याचे नियोजन आणि समन्वय ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकारी आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे पार पाडले. क्षेत्र संचालक डॉ. प्रभू नाथ शुक्ला आणि उपसंचालक विशाल माळी यांनी या संपूर्ण व्यवस्थेचे नेतृत्व केले. त्यांना सहाय्यक वनसंरक्षक एस. एस. दुबे, संकेत वाठोरे आणि विवेक नातू, तसेच पळसगाव आणि कोलारा वनपरिक्षेत्रांचे वनपरिक्षेत्र अधिकारी व इतर क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. या सर्वांनी सुरळीत वाहतूक व्यवस्था, पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना आणि प्रभावी निसर्ग मार्गदर्शन सुनिश्चित केले.
या भेटीद्वारे ब्रिक्स देशांच्या प्रतिनिधींना ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील अधिवास व्यवस्थापन, शिकारीविरोधी उपाययोजना आणि स्थानिक समुदायांच्या सहभागातून राबविण्यात येणाऱ्या संवर्धन उपक्रमांची प्रत्यक्ष माहिती मिळाली. अनेक प्रतिनिधींनी हा वन्यजीव अनुभव आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असल्याची भावना व्यक्त केली. या भेटीमुळे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाने व्याघ्र संवर्धन आणि जबाबदार वन्यजीव पर्यटनासाठी भारतातील अग्रगण्य स्थळ म्हणून आपली ओळख पुन्हा अधोरेखित केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव