
चंद्रपूर, 12 जुलै (हिं.स.)आषाढी पंढरपूर वारी-२०२५ दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी निधन झालेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील चरुर (खटी) येथील वारकरी दिवंगत प्रफुल पिंपळकर यांच्या कुटुंबाला शासनाकडून चार लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळावे, यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांच्याकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांची दखल घेत शासनाने पिंपळकर यांच्या वारसांना चार लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर केले आहे. या निर्णयामुळे पिंपळकर कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून, शासनाने दाखविलेल्या या संवेदनशीलतेबद्दल आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदजी जाधव-पाटील यांचे आभार मानले आहेत.
आषाढी पंढरपूर वारी-२०२५ दरम्यान वरोरा तालुक्यातील चरुर (खटी) येथील वारकरी प्रफुल पिंपळकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. शासनाच्या विठ्ठल रखुमाई योजनेअंतर्गत त्यांच्या वारसांना चार लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत शासनाने अखेर प्रफुल पिंपळकर यांच्या वारसांना चार लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर केले. या मदतीमुळे कुटुंबाला आर्थिक आधार मिळाला असून, संकटाच्या काळात शासन त्यांच्या पाठीशी संवेदनशीलतेने उभे असल्याचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव