सोलापूर : खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या कथित धमकीची ऑडिओ क्लिप व्हायरल
सोलापूर, 12 जुलै (हिं.स.)। माढा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील आणि माळशिरस पंचायत समितीचे उपअभियंता इस्माईल मुलाणी यांच्यातील कथित मोबाईल संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली
Patil Mohite


सोलापूर, 12 जुलै (हिं.स.)। माढा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील आणि माळशिरस पंचायत समितीचे उपअभियंता इस्माईल मुलाणी यांच्यातील कथित मोबाईल संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, त्यामुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये खासदार मोहिते-पाटील यांनी उपअभियंता मुलाणी यांच्याशी शिवीगाळ करत हात-पाय तोडण्याची धमकी दिल्याचा दावा केला जात आहे. संभाषणात उपअभियंता मी सोलापुरात आहे, असे सांगत असल्याचे, त्यानंतर त्यांना उद्या आला नाही तर दाखवितो, अशा शब्दांत धमकी दिल्याचे कथितरित्या ऐकू येत असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, माळशिरस पंचायत समितीतील उपअभियंता इस्माईल मुलाणी यांच्याविरोधात विविध तक्रारी प्रलंबित असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, त्या तक्रारींवर अद्याप कोणतीही ठोस प्रशासकीय कारवाई झालेली नसल्याचे सांगितले जात आहे.या पार्श्वभूमीवर संबंधित मोबाईल संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या ऑडिओ क्लिपच्या सत्यतेबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नसून, तसेच खासदार धैर्यशील मोहिते-पाटील किंवा उपअभियंता इस्माईल मुलाणी यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाबाबत पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande