
छत्रपती संभाजीनगर, 12 जुलै, (हिं.स.)। सर्व सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील आस्थापनांनी संपणाऱ्या तिमाहीची नमुना ईआर-१ मधील त्रैमासिक मनुष्यबळ सांख्यिकी माहिती ३१ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करावी,असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, धाराशिवचे सहायक आयुक्त संजय गुरव यांनी केले आहे.
जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,धाराशिव कार्यालयामार्फत जून २०२६ अखेर संपणाऱ्या तिमाहीसाठी नमुना ईआर-१ मधील त्रैमासिक सांख्यिकी माहिती संकलनाचे काम सुरू असून, या उपक्रमाला जिल्ह्यातील सर्व आस्थापनांचा १०० टक्के प्रतिसाद मिळणे अत्यंत आवश्यक आहे. संबंधित त्रैमासिक विवरणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२६ असून,विहित मुदतीत ऑनलाईन पद्धतीने माहिती सादर करून कायद्याचे पालन करावे,असे आवाहन करण्यात आले आहे.तसेच प्रत्येक आस्थापनेने आपल्या नोंदणीचा तपशील पडताळून आवश्यक ती सर्व माहिती अद्ययावत करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे सक्तीने अधिसूचित करणे) कायदा, १९५९ व नियम १९६० मधील कलम ५ (१) नुसार सर्व सार्वजनिक क्षेत्रातील तसेच शासकीय, निमशासकीय आणि संबंधित खाजगी क्षेत्रातील आस्थापनांनी, तसेच कलम ५ (२) अंतर्गत येणाऱ्या खाजगी आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनांमधील सर्व कर्मचाऱ्यांची स्त्री,पुरुष व एकूण कर्मचारी संख्या यासह सांख्यिकी माहिती प्रत्येक तिमाहीत विहित नमुना ईआर-१ मध्ये नियमितपणे सादर करणे बंधनकारक आहे.
ही माहिती महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरावयाची आहे.यासाठी जिल्ह्यातील सर्व आस्थापनांना जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत यापूर्वीच युजर नेम व पासवर्ड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. संबंधित संकेतस्थळावर लॉगिन करून प्रत्येक आस्थापनेने अचूक व अद्ययावत माहिती विहित मुदतीत सादर करावी,असेही आवाहन करण्यात आले आहे.
या संदर्भात कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन किंवा सहकार्य आवश्यक असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,धाराशिव कार्यालयाशी दूरध्वनी क्रमांक ०२४७२-२९९४३४ वर संपर्क साधावा.तसेच dharashivrojgar@gmail.com किंवा asstdiramp.osmanabad@ese.maharashtra.gov.in या ई-मेल आयडीवर उद्योजक नोंदणी क्रमांक व इतर आवश्यक तपशीलासह संपर्क साधून आवश्यक माहिती मिळवावी,असे सहायक आयुक्त संजय गुरव यांनी कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis