
गडचिरोली, 12 जुलै (हिं.स.)
येथील एटापल्ली तालुक्यांतर्गत येणाऱ्या पिपली बुर्गी उपपोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंडम गावाजवळ रविवारी नक्षलवाद्यांचे बॅनर आणि पत्रके आढळून आल्याने परिसरात पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून संपूर्ण परिसरात सखोल शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
घटनेच्या ठिकाणी आढळलेल्या पत्रकांमध्ये स्वतःला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (माकप-माओवादी) असल्याचे सांगत, विविध कंपन्यांच्या विरोधात लोकांनी एकत्र येऊन आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पत्रकांमध्ये ओमसाई, नॅचरल कंपनी, सनफ्लॉवर आणि इतर प्रकल्प बंद करण्याबाबत ईशारा देण्यात आला आहे.तसेच ग्रामीण नागरिक, सरपंच आणि पटेलांना या कंपन्यांचा विरोध करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पत्रकांमध्ये असेही लिहिले आहे की, या कंपन्यांमुळे जल, जंगल आणि जमीन विकली जात असून भविष्यात स्थानिक लोकांच्या मुलांचे अस्तित्व धोक्यात येईल. याशिवाय, कंपन्यांचे समर्थन करणाऱ्यांना गंभीर परिणाम भोगण्याचा इशारा (धमकी) देण्यात आला आहे.नक्षलवाद्यांनी आपल्या संदेशात सनफ्लॉवर प्रकल्प, हेडकसा-कुदरी-मोहरली क्षेत्रातील नॅचरल कंपनी, जेएसडब्ल्यू (JSW) प्रकल्प तसेच खेमरागडी-पिपली बुर्गी क्षेत्रात प्रस्तावित असलेल्या ड्रोन सर्वेक्षणालाही विरोध केला असून हे काम तातडीने बंद करण्याची चेतावणी दिली आहे.
विशेष म्हणजे, सुरक्षा दलांकडून सातत्याने राबवल्या जाणाऱ्या मोहिमांनंतर जिल्ह्यात नक्षली कारवाया बऱ्याच अंशी कमकुवत झाल्याचा दावा केला जात आहे. मात्र, कुंडम गावाजवळ मिळालेल्या या बॅनर्स आणि पत्रकांनी नक्षलवाद्यांच्या सक्रियतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.सध्या पोलिसांनी हे बॅनर आणि पत्रके जप्त करून तपास सुरू केला आहे. तसेच आजूबाजूचे जंगल आणि संवेदनशील भागातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. या घटनेनंतर स्थानिक गावकऱ्यांमध्ये भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Milind Khond