
बीड, 12 जुलै (हिं.स.)।
महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्मा बीड यंत्रणे मार्फत विविध शेतकरी प्रशिक्षणाचे सन 2026- 27 अंतर्गत नियोजन करण्यात आलेले असून त्याचाच एक भाग म्हणून माजी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचे सुचनेनुसार प्रकल्प संचालक आत्मा सुभाष जी साळवे, प्रकल्प उपसंचालक सुरज पाटील यांचे मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी सर्व तालुके यांचे मार्फत आत्मा योजनेअंतर्गत दुग्ध उत्पादन, जनावरांचे आरोग्य, गोठा व्यवस्थापन व दुग्ध जन्य पदार्थ विक्री व्यवस्थापनाचे या विषयाचे दिनांक 13 ते 15 जुलै या कालावधीत राष्ट्रीय दुग्ध विकास संस्था आनंद , गुजरात येथे 3 दिवसीय निवासी प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेले आहे. त्या प्रशिक्षणाकरिता प्रकल्प संचालक आत्मा बीड कार्यालयामार्फत शेतकरी बांधवांना नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते त्यास प्रतिसाद म्हणून बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शेतकरी बांधवांनी नोंदणी केली. त्यातीलच प्रशिक्षणासाठी बीड जिल्ह्यातील 42 शेतकऱ्यांची पहिली बॅच आज दिनांक 12 जुलै 2026 रोजी रवाना झाली आहे. कृषी उपसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय दादाराव जाधवर व ॲड शेख सादेक, जिल्हा सत्र न्यायालय बीड यांनी हिरवी झेंडी दाखवून शेतकरी प्रशिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.
यामध्ये माजलगाव तालुक्यातील 14, बीड 02, धारूर 04, केज 13 वडवणी 1 व परळी तालुक्यातील 09 अशी एकूण 42 शेतकरी उपस्थित होते. आत्मा यंत्रणे मार्फत सदर शेतकऱ्यांचे प्रवास, प्रशिक्षण, निवास ची व्यवस्था करण्यात आलेली आहे. बीड जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यामध्ये अशीच शेतकरी प्रशिक्षणासाठी नियोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी आत्ताच आपले तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील आत्मा यंत्रणेशी संपर्क साधून नाव नोंदणी करावी अशी आवाहन केले आहे.
प्रशिक्षणासाठी शेतकरी बांधवांना रवाना करताना ॲड श्री सादेक शेख, जिल्हा सत्र न्यायालय हे उपस्थित होते. यावेळी सध्याच्या परिस्थितीमध्ये शुद्ध दूध आणि उत्तम प्रतीचे दुग्ध जन्य पदार्थ बाजारात ऊपलब्ध व्हावेत अशी अपेक्षा नागरिक करत असतात त्या साठी हे प्रशिक्षण बीड जिल्ह्यासाठी एक महत्वाचा भाग आहे. आत्मा यंत्रणा मार्फत शेतकरी बांधवांसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातात याचा बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा असे त्यांनी मत व्यक्त केले.
या प्रशिक्षणाचे आयोजन व शेतकऱ्यांचे प्रवासाची नियोजनासाठी श्री आनंद मुंडे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक, केज, श्री अनंत फुटाणे ,सहाय्यक कृषी अधिकारी वडवणी व जबेर पठाण, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, बीड यांनी अथक परिश्रम घेतले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis