
लातूर, 12 जुलै (हिं.स.)।लातूर येथे सहकार विभागाच्या अत्याधुनिक सहकार संकुल इमारतीचे भूमिपूजन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. सहकार क्षेत्राशी संबंधित सर्व कार्यालये एकाच छताखाली उपलब्ध करून देणारे हे संकुल सहकारी संस्था, बँका आणि शेतकऱ्यांसाठी मोठी सुविधा ठरणार असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.
यावेळी बोलताना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की, महाराष्ट्राची ओळख सहकार चळवळीमुळे असून या चळवळीने लाखो कुटुंबांना आर्थिक बळ दिले आहे. बदलत्या काळात सहकार क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना पारंपरिक व्यवसायांबरोबरच किराणा दुकाने, जेनेरिक औषध दुकाने आणि इतर उद्योग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले की, सहकार चळवळीने राज्याच्या विकासात मोठा वाटा उचलला आहे. लातूर जिल्ह्यातील सहकारी संस्था आणि बँकांना अधिक सक्षम करण्यासाठी उभारण्यात येणारे सहकार संकुल महत्त्वाची भूमिका बजावेल. सहकार विभागाच्या सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने नागरिकांची वेळ वाचेल आणि कामकाज अधिक सुलभ होईल. संकुलाचे बांधकाम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.
यावेळी विधान परिषद सदस्य तथा मुख्य प्रतोद आमदार विक्रम काळे, जिल्हा परिषद अध्यक्षा उषाताई पाटील तळेगावकर, महापौर जयश्री सोनकांबळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, समाजकल्याण सभापती उत्तम माने यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि सहकार क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमात आमदार विक्रम काळे यांनी शेतकरी व सहकारी संस्थांसाठी उभारण्यात येणारे सहकार संकुल वेळेत आणि उच्च दर्जाने पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त केली. प्रास्ताविक विभागीय सहनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सहायक निबंधक गडेकर यांनी मानले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis