
लातूर, 12 जुलै (हिं.स.)। लातूर तालुक्यातील खंडापूर येथे २१ फेब्रुवारी ते २ मार्चदरम्यान झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहातून ३ कोटी ६५ लाख रूपयांचा अपहार केल्या प्रकरणी किशोर जाधव महाराज शिवणीकर व त्याच्या सहकाऱ्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात जून महिन्यात गुन्हा दाखल झाला होता. महिनाभरापासून किशोर धोंडीबा जाधव उर्फ किशोर महाराज शिवणीकर फरात होता. मोतीनगर येथील नव्या घरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दि. १० जुलै रोजी त्याच्या घराचे अमेरिकन कंपनीचे तीन कुलूप तोडून किशोर महाराजास ताब्यात घेतले. किशोर महाराजाला दीड कोटींच्या घराचा मोह नडल्याने आज ते पोलीस कोठडीची हवा खात आहेत.
श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या वैकुंठगमण सोहळ्याच्या सांगते निमित्त तसेच श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या ६७५ व्या संजीवन समाधी सोहळा दि. २१ फेब्रुवारी ते २ मार्चदरम्यान लातूर शहरापासून जवळच असलेल्या खंडापूर शिवारात झाला. संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु तुकाराम महाराज, संत जनाबाई यांच्यासह सात संतांच्या पवित्र पादुकाही हेलिकॉप्टरने येथे आणल्या होत्या. हजारों भाविकांनी उपस्थित राहून दर्शन घेत कोट्यावधी रुपयांचा निधी दिली. परंतु, संयोजन समितीतील पाच जणांनी या निधीचा अपहार केला होता. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात जुन महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गेल्या महिनाभरापासून फरार असलेला आरोपी किशोर महाराज शिवणीकर याने मोतीनगर लातूर येथे दीड कोटीचे नवीन घर घेतले. या घरात ते वास्तव्यास असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकामधील पथकाने घर भाडयाने राहण्याच्या बहान्याने ते घरात दाखल झाले. मात्र वरच्या मजल्यावरील घर दाखवण्यास यावेळी टाळाटाळ करताच पोलिसांनी चावी बनवणाऱ्यांना बोलवले. घराला अमेरीकन कंपीनेचे कुलूप लावले होते. तीन कुलूप उघडून दुसऱ्या मजल्यावरून किशोर महाराज शिवाणीकर यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन एमआयडीसी पोलिसांकडे सुपूर्द केले.
लातूरच्या सहा ठिकाणी वारकरी संप्रदायाचे सोहळे झाले. त्या ठिकाणच्या सोहळ्यात एका पैशाचाही अपहार झालेला नाही. लातूरमध्ये मात्र संयोजन समितीनेच अपहार केला. त्यानंतर दि. ३० एप्रिल रोजी ज्ञानेश्वर विठ्ठल कदम उर्फ ह. भ. प. छोटे कदम माऊली महाराज, ह. भ. प. माणिक महाराज मोर यांनी लातूरच्या शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेवून किशोर महाराज जाधव-शिवणीकर आणि बजरंग काबरा, सागर डामगिरे, बालाजी भोसले, ज्ञानोबा भिसे हे त्यांचे चार साथीदार यांनी निधी, देणग्या गोळा केल्या. परंतु, त्याचा हिशोब दिला नाही. ट्रस्ट स्थापन करण्यासाठी काही जणांच्या कोऱ्या कागदावर स्वाक्षऱ्या घेतल्या, ट्रस्ट स्थापन केली नाही, असा आरोप केला होता.
सात दिवस चाललेल्या या सोहळ्यात राज्यातून आणि राज्या बाहेरूनदेखील भाविकांनी गर्दी करत कोट्यावधिचे दान दिले होते, मात्र भाविकांच्या दिलेल्या दानावर डल्ला मारून कोट्यावधी रुपये घेऊन किशोर महाराज शिवणीकर फरार झाला आणि कांही दिवसातच लातूर शहरातील मोतीनगर भागात किशोर जाधव शिवणीकर याने दीड कोटींचा आलिशान बंगला घेतला. खंडापूर गावातील भाविकांनी त्याला हिशोब विचारला असता पिस्तूल हातात घेतलेला फोटो स्टेटसला ठेऊन ग्रामस्थांना धमकावण्याचा प्रयत्न किशोर जाधव शिवणीकर याने केला, दरम्यान किशोर जाधव याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर देखील किशोर शिवणीकर पोलिसांच्या हाती लागत नव्हता, मात्र अखेर लातुरातील दीड कोटींच्या बंगल्यात किशोर जाधव आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्या नंतर पोलिसांनी मोठ्या शीताफीने नुकतीच किशोर जाधवला अटक केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis