लाड पागे समितीच्या शिफारसींनुसार सुमारे 500 लोकांना लवकरच नियुक्तीचे आदेश - मुख्यमंत्री
नागपूर, 12 जुलै, (हिं.स.)। सफाई कर्मचाऱ्यांसह समाजातील प्रत्येक घटकाच्या आर्थिक, सामाजिक उन्नतीसाठी राज्य सरकार, महापालिका कटिबद्ध आहे. महानगराच्या वाढत्या गरजा व आव्हाने लक्षात घेता लवकरच लाड पागे समितीच्या शिफारसींनुसार सुमारे 500 लोकांना नियुक्
नागपूर


नागपूर, 12 जुलै, (हिं.स.)। सफाई कर्मचाऱ्यांसह समाजातील प्रत्येक घटकाच्या आर्थिक, सामाजिक उन्नतीसाठी राज्य सरकार, महापालिका कटिबद्ध आहे. महानगराच्या वाढत्या गरजा व आव्हाने लक्षात घेता लवकरच लाड पागे समितीच्या शिफारसींनुसार सुमारे 500 लोकांना नियुक्तीचे आदेश निर्गमित केले जात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नागपूर महापालिकेच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत आणि प्रधानमंत्री आवास योजना 2.0 (शहरी) अंतर्गत स्वप्नपूर्ती सदनिका प्रकल्पांच्या भूमिपूजन समारंभात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

केंद्रीय परिवहन व रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त राज्यमंत्री अॅड. आशीष जयस्वाल, महापौर नीता ठाकरे, सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंह डागोर, उपमहापौर श्रीमती लिला हातीबेड, स्थायी समितीच्या अध्यक्ष शिवानी दाणी, माजी महापौर दयाशंकर तिवारी, महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. विपीन इटनकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

महर्षी सुदर्शन वाल्मिकी यांच्या नावाने सफाई कर्मचाऱ्यांसाठी ही वसाहत उभी होणार असल्याने वसाहतीच्या कामात कुठलीही कमतरता राहू नये याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिले. गरिबांच्या घराच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रधानमंत्री आवास योजना ही अत्यंत महत्त्वाची अशी योजना आहे. आगामी काळात सर्व विधानसभा क्षेत्रांत या योजनेची अंमलबजावणी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महानगरपालिकेचा प्रकल्प अत्यंत स्तुत्य उपक्रम - नितीन गडकरी

सुदर्शन वाल्मिकी समाजाचे जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने महानगर पालिकेचा हा प्रकल्प अत्यंत स्तुत्य असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. दोन्ही प्रकल्पांच्या माध्यमातून आठशे ते नऊशे कुटुंबांना हक्काची घरे मिळणार असून राज्य सरकारने त्याकडे विशेष लक्ष दिले आहे. समाजाने आता आधुनिक काळाच्या गरजा लक्षात घेऊन हॉस्पिटॅलिटीच्या क्षेत्रात पदार्पण करावे, छोट्या-छोट्या कंपन्या सुरु करुन सेवा पुरवाव्या आणि रोजगारांची निर्मितीही करावी, असे आवाहनही गडकरी यांनी यावेळी केले.

महापौर निता ठाकरे यांनी आपल्या प्रास्ताविकात या प्रकल्पाची माहिती दिली. उपमहापौर लिला हातीबेड यांनी राज्य सरकार व महानगर पालिकेच्या माध्यमातून समाजाच्या उन्नतीसाठी होत असलेल्या विशेष कामांचा यावेळी उल्लेख केला. सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंह डागोर यांनी आपल्या मनोगतात या उल्लेखनीय विकास कामांबद्दल राज्य शासन व महापालिकेचे आभार मानले.

नागपूर महानगर पालिकेच्यावतीने मौजा नारी येथे साकारण्यात येत असलेल्या महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहतीत सफाई कर्मचाऱ्यांसाठी एकूण 14 इमारतींमध्ये दोन बीएचकेच्या तब्बल 392 सदनिका उभारण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे प्रधानमंत्री आवास योजनेच्या स्वप्नपूर्ती गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांसाठी परवडणाऱ्या किमतीत एक आणि दोन बीचएकेच्या एकूण 518 सदनिका उभारल्या जाणार आहेत. तीन वर्षात हे प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या वसाहतीमध्ये उद्यान, पाणीपुरवठा, सोलर, खेळाचे मैदान, सुरक्षा असा सर्व प्रकारच्या दर्जेदार सुविधा उभारल्या जाणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande