
पुणे, 12 जुलै (हिं.स.)लोणावळा–कर्जत रेल्वे मार्गावर दरड कोसळल्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली असून, १७ जुलैपर्यंत पुणे-मुंबईसह दक्षिण भारत आणि उत्तर भारताकडे जाणाऱ्या २७ रेल्वे गाड्या पर्यायी मार्गाने चालविण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
६ जुलै रोजी मुसळधार पावसामुळे लोणावळा–कर्जत घाट विभागात मोठी दरड कोसळल्याने या मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. त्यानंतर पुणे-मुंबई मार्गावरील तसेच गुजरात, राजस्थान, उत्तर भारत आणि दक्षिण भारताकडे धावणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या, तर अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले.पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या इंटरसिटी एक्सप्रेस, डेक्कन एक्सप्रेस, तसेच गोरखपूर, जोधपूर, इंदूर, हुबळी, हैदराबाद, चेन्नई या मार्गांवरील गाड्या आणि कोल्हापूर–महालक्ष्मी एक्सप्रेस यांसह सुमारे ३० गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय काही गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या असून, काही गाड्या पर्यायी स्थानकांवरून सोडण्यात येत आहेत.मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, ११ जुलै ते १७ जुलै या कालावधीत एकूण २७ गाड्या पर्यायी मार्गाने धावतील. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी आपल्या गाडीची अद्ययावत माहिती तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे.दरम्यान, दरड हटवून रेल्वे मार्ग पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, सेवा शक्य तितक्या लवकर सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रवाशांनी गाड्यांच्या वेळापत्रक आणि मार्गातील बदलांची माहिती रेल्वे हेल्पलाइन किंवा एनटीईएस (NTES) ॲपच्या माध्यमातून घ्यावी, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु