
परभणी, 12 जुलै (हिं.स.)।
जनाईनगरी अर्थात गंगाखेड येथील संतश्रेष्ठ जनाबाईंच्या पालखीचे पंढरीच्या दिशेने प्रस्थान मोठ्या भक्तीमय वातावरणात प्रस्थान झाले. या प्रस्थान सोहळ्यास आमदार रत्नाकर गुट्टे सपत्नीक उपस्थित राहिले. तसेच विधिवत पूजा करून संत जनाबाईंच्या पवित्र पालखीचे दर्शन घेतले. भक्तिमय वातावरण, टाळ-मृदुंगाचा गजर आणि विठ्ठलनामाच्या अखंड जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. या पवित्र सोहळ्याचा साक्षीदार होताना मनाला आध्यात्मिक समाधान लाभले. याप्रसंगी संत जनाबाईंच्या पवित्र चरणी कृतज्ञतापूर्वक वंदन करून सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि सद्बुद्धी नांदो, तसेच संतांची भक्ती, सेवा आणि समतेची शिकवण प्रत्येकाच्या आचरणात उतरावी, अशी मनोभावे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी प्रार्थना केली.
संत जनाबाई या वारकरी संप्रदायातील एक तेजस्वी संतकवयित्री होत्या. संत नामदेव महाराजांच्या सहवासात त्यांनी भक्ती, नम्रता, समर्पण आणि ईश्वरनिष्ठेचा आदर्श समाजासमोर ठेवला. त्यांच्या अभंगांतून विठ्ठलभक्ती, श्रमप्रतिष्ठा, स्त्रीशक्ती आणि मानवतेचा संदेश आजही समाजाला प्रेरणा देत आहे. शिवाय संत जनाबाई यांनी आपल्या साध्या, कष्टमय जीवनातून भक्तीचा सर्वोच्च आदर्श घालून दिला. प्रत्येक कर्मात परमेश्वराचे दर्शन घडविणारी त्यांची शिकवण ही समाजाला समतेचा, सेवाभावाचा आणि निस्वार्थ भक्तीचा संदेश देणारी आहे. म्हणूनच त्यांचे कार्य आणि विचार आजही वारकरी संप्रदायासाठी प्रेरणादायी ठरत आहेत, असेही नमूद केले.
पालखी सोहळा हा केवळ धार्मिक परंपरेचा भाग नसून आपल्या सांस्कृतिक वारशाचे जतन करणारा आणि समाजात एकात्मता, बंधुभाव व सद्भावना वृद्धिंगत करणारा पवित्र उत्सव आहे. अशा सोहळ्यांमधून संतांच्या विचारांचे जतन आणि प्रसार करण्याची प्रेरणा प्रत्येकाला मिळत असते, असेही सांगितले. यावेळी संत जनाबाई देवस्थानचे सर्व पदाधिकारी तसेच गंगाखेडसह परिसरातील भाविक, भक्त, वारकरी बांधव आणि स्थानिक महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis