रेणापूर मारहाण प्रकरण - व्हायरल व्हिडिओनंतर आरोपींची संख्या आठवर
लातूर, 12 जुलै (हिं.स.)। रेणापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खारोळा येथे अल्पवयीन मुलांना झालेल्या अमानुष मारहाण प्रकरणात महत्त्वाची प्रगती झाली असून, समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या तांत्रिक विश्लेषणासह पुरावे आणि फिर्यादीच्या पुरवणी जब
रेणापूर पोलीस


लातूर, 12 जुलै (हिं.स.)।

रेणापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खारोळा येथे अल्पवयीन मुलांना झालेल्या अमानुष मारहाण प्रकरणात महत्त्वाची प्रगती झाली असून, समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या तांत्रिक विश्लेषणासह पुरावे आणि फिर्यादीच्या पुरवणी जबाबाच्या आधारे या गुन्ह्यात आणखी सहा आरोपींची भर घालण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींची एकूण संख्या आता आठ झाली आहे.

पोलीस ठाणे रेणापूर येथे दाखल गुन्हा क्रमांक ३४१/२०२६ च्या तपासादरम्यान फिर्यादीचा पुरवणी जबाब, साक्षीदारांचे जबाब आणि व्हायरल व्हिडिओतील दृश्यांची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर आरोपी म्हणून सचिन राऊतराव, संतोष राऊतराव, बबलू काळे, नितीन शिंदे, दत्ता जाधव, बालू सूर्यवंशी, गणेश भोपी आणि दर्शन भोपी यांची नावे निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

तपासानुसार, सर्व आरोपींनी मिळून अल्पवयीन मुलांना पाईप आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच फिर्यादीला लिंबाच्या झाडाला दोरीने बांधून ठेवले, तर त्याच्या दोन मित्रांना शेडच्या खांबाला बांधून शिवीगाळ, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे.

याचबरोबर या मारहाणीचा व्हिडिओ चित्रित करून तो समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आल्याचेही तपासात उघड झाले आहे. या व्हिडिओमुळे तपासाला महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मायने आणि पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. मारहाण आणि संबंधित अन्य गुन्ह्यांचा सखोल तपास सुरू असून, तपासादरम्यान जे कोणी दोषी आढळतील त्यांच्याविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा लातूर जिल्हा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande