मंगळवेढ्यात नदीकाठच्या कृषी पंपांना केवळ दोन तास वीज; शेतकऱ्यांमध्ये संताप
सोलापूर, 12 जुलै (हिं.स.)अल निनोच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने काही तालुक्यांतील नदीकाठच्या कृषी पंपांना दररोज पाच तास वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, मंगळवेढा तालुक्यात नदीकाठच्या कृषी पंपांना केवळ द
मंगळवेढ्यात नदीकाठच्या कृषी पंपांना केवळ दोन तास वीज; शेतकऱ्यांमध्ये संताप


सोलापूर, 12 जुलै (हिं.स.)अल निनोच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने काही तालुक्यांतील नदीकाठच्या कृषी पंपांना दररोज पाच तास वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, मंगळवेढा तालुक्यात नदीकाठच्या कृषी पंपांना केवळ दोन तास वीजपुरवठा सुरू ठेवल्याने शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.मंगळवेढा तालुक्यातील भीमा नदीकाठी उचेठाण, बठाण, माचणूर, सिद्धापूर आणि अरळी येथे बंधारे आहेत. या बंधाऱ्यांवर नदीकाठच्या शेतीसह मंगळवेढा शहर आणि भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. विशेषतः उचेठाण बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा होत असल्याने या भागातील पाण्याचा वापर अधिक आहे.शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, इतर काही तालुक्यांमध्ये नदीकाठच्या कृषी पंपांसाठी पाच तास वीजपुरवठा देण्यात येत असताना मंगळवेढ्याला मात्र दोन तासांपुरताच पुरवठा ठेवण्यात आल्याने प्रशासनाने दुजाभाव केल्याची भावना निर्माण झाली आहे.वीजपुरवठा अपुरा असल्याने नदीकाठच्या ऊस, द्राक्षे, केळी, भाजीपाला तसेच इतर बागायती पिकांवर संकट ओढवले आहे. मंगळवेढा तालुक्यातील नदीकाठचा परिसर हा साखर कारखान्यांसाठी ऊस उत्पादनाचा महत्त्वाचा पट्टा मानला जातो. गतवर्षी उजनी धरणातून पाणी उशिरा सोडल्यामुळे शेतकरी आधीच अडचणीत असताना, यंदा अपुऱ्या पावसासह कमी कालावधीच्या वीजपुरवठ्यामुळे संकट अधिक गडद झाल्याचे शेतकरी सांगत आहेत.या पार्श्वभूमीवर मंगळवेढा तालुक्यातील नदीकाठच्या कृषी पंपांनाही इतर तालुक्यांप्रमाणे दररोज पाच तास वीजपुरवठा देण्याची मागणी शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande