
सोलापूर, 12 जुलै (हिं.स.)माण नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा करून विनापरवाना वाहतूक करणाऱ्या वाहनावर मंगळवेढा उपविभागीय पोलिसांच्या पथकाने धडक कारवाई करत सुमारे ५ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी वाहन चालक, मालक आणि अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान गुप्त माहितीच्या आधारे माण नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक होत असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी लोटेवाडी परिसरात सापळा रचला.संशयित टमटम वाहन अडविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वाहन न थांबवता पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून वाहन ताब्यात घेतले. मात्र चालक आणि त्याच्यासोबत असलेले दोन अनोळखी इसम अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून फरार झाले.वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये अंदाजे एक ब्रास वाळू आढळून आली. पोलिसांनी अशोक लेलँड कंपनीचे टमटम वाहन (किंमत ५ लाख ७७ हजार रुपये), सुमारे ७ हजार रुपयांची वाळू आणि ५ हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण ५ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.या प्रकरणी दादा कांबळे (वाहन चालक), बंटी कांबळे (वाहन मालक, रा. अचकदाणी) तसेच अन्य दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड