
लातूर, 12 जुलै (हिं.स.)।
अन्न व औषध प्रशासनाने (FDA) दूध भेसळीविरोधात सुरू केलेल्या कारवाई अंतर्गत रेणापूर येथे दूध वाहतूक करणारा ट्रक रोखून तपासणी केली. या कारवाईत २३८ लिटर म्हशीचे दूध भेसळयुक्त असल्याचे आढळून आल्याने संबंधित दूध जागेवरच नष्ट करण्यात आले.
दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळीला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून विविध ठिकाणी तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. याच मोहिमेअंतर्गत रेणापूर परिसरात दूध वाहतूक करणाऱ्या वाहनाची तपासणी करण्यात आली.
तपासणी दरम्यान दूध संशयास्पद आढळल्याने त्याची गुणवत्ता तपासण्यात आली. त्यामध्ये २३८ लिटर म्हशीचे दूध भेसळयुक्त ठरल्याने ते नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने जागेवरच नष्ट करण्यात आले.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात अन्नपदार्थांमधील भेसळीविरोधात कठोर मोहीम सुरू असून, दूध भेसळ करणाऱ्यांवरही प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या भेसळखोरांची गय केली जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे. दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या गुणवत्तेबाबत संशय असल्यास नागरिकांनी संबंधित प्रशासनाकडे तक्रार करण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.
रेणापूरमधील या कारवाईमुळे दूध विक्रेते आणि वाहतूकदारांमध्ये खळबळ उडाली असून, भेसळखोरांविरोधातील FDAची कारवाई आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis