मोशी कचरा डेपो दुर्घटना : तब्बल ८३ तासांनंतर शोधमोहीम संपली; मृतांचा आकडा ९
पुणे, 12 जुलै (हिं.स.)।मोशी येथील कचरा डेपो दुर्घटनेनंतर सलग ८३ तास सुरू असलेली शोध व बचावमोहीम रविवारी (१२ जुलै) पहाटे अखेर संपुष्टात आली. कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अडकलेले अखेरचे बेपत्ता कामगार वामन कसबे यांचा मृतदेह पहाटे सुमारे एक वाजण्याच्या सुम
Moshi


पुणे, 12 जुलै (हिं.स.)।मोशी येथील कचरा डेपो दुर्घटनेनंतर सलग ८३ तास सुरू असलेली शोध व बचावमोहीम रविवारी (१२ जुलै) पहाटे अखेर संपुष्टात आली. कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अडकलेले अखेरचे बेपत्ता कामगार वामन कसबे यांचा मृतदेह पहाटे सुमारे एक वाजण्याच्या सुमारास शोध पथकाला आढळला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी वायसीएम रुग्णालयात पाठविण्यात आला. यामुळे या भीषण दुर्घटनेतील मृतांचा आकडा नऊवर पोहोचला असून सर्व बेपत्ता व्यक्तींचा शोध पूर्ण झाल्याने प्रशासनाने शोधमोहीम अधिकृतपणे थांबविली.

८ जुलै रोजी दुपारी मोशी येथील 'वेस्ट टू एनर्जी' प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा प्रचंड ढिगारा कोसळल्याने एकूण २३ कामगार अडकले होते. त्यापैकी पाच जण स्वतः बाहेर पडण्यात यशस्वी झाले, तर नऊ जणांना बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले. गुरुवारी भावेश वाणी यांचा मृतदेह सापडल्यानंतर उर्वरित आठ जणांचा शोध सुरू होता.शनिवारी दुर्घटनाग्रस्त इमारतीचा काही भाग नियंत्रित पद्धतीने पाडून आत प्रवेशाचा मार्ग तयार करण्यात आला. त्यानंतर सात जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. अखेर रविवारी पहाटे वामन कसबे यांचाही मृतदेह सापडल्याने चार दिवसांपासून सुरू असलेली शोधमोहीम पूर्ण झाली.

या संपूर्ण बचावकार्यात सतत कोसळणारा कचऱ्याचा ढिगारा, विषारी वायू, ढासळलेले काँक्रीटचे बीम आणि पिलर यामुळे मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. प्रतिकूल परिस्थितीतही भारतीय सेना, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), पिंपरी-चिंचवड महापालिका, पीएमआरडीए अग्निशमन दल, पोलीस आणि इतर यंत्रणांनी समन्वयाने सलग चार दिवस बचावकार्य राबविले.महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, प्रशासकीय इमारतीतील बचावकार्य पूर्ण झाले असून सर्व बेपत्ता व्यक्तींचा शोध लागल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली आहे. कचऱ्यासह मोठे बीम आणि पिलर अडकलेल्या व्यक्तींवर कोसळल्याने त्यांना वाचविणे शक्य झाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande