
रत्नागिरी, 12 जुलै, (हिं.स.) । राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिपळूण तालुका कार्यकारिणीची बैठक पाग कन्याशाळेच्या सभागृहात पार पडली. याच पद्धतीने यापुढे पक्षाचे पदाधिकारी आठवड्यातून पाच दिवस चिपळूण जनसंपर्क कार्यालयात जनतेच्या समस्या सोडविणार आहेत.
पाग येथील बैठकीत शासनाच्या विविध योजनांचा आढावा, पूरस्थिती तसेच आगामी पक्षीय उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. यावेळी नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आठवड्यातून पाच दिवस आमदार शेखर निकम यांच्या चिपळूण येथील जनसंपर्क कार्यालयात उपलब्ध राहतील, असा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
बैठकीत शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या एसआयआर कार्यक्रमाबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच २२ जुलै रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त १३ जुलैपासून तालुकाभर वृक्षारोपण व वृक्षवाटपाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
शासकीय व निमशासकीय कार्यालयांमधील नागरिकांची प्रलंबित कामे व अडचणी सोडविण्यासाठी आमदार शेखर निकम यांच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. आठवड्यातील चार दिवस प्रांतिक उपाध्यक्ष शौकतभाई मुकादम, जयेंद्रथ खताते आणि अबुशेठ ठसाले कार्यालयात उपलब्ध राहतील. प्रत्येक गुरुवारी पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत खेतले तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी उपस्थित राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले. संबंधित प्रश्नांचा आढावा घेऊन ते मार्गी लावण्यासाठी आमदार शेखर निकम प्रयत्नशील राहतील, असेही बैठकीत सांगण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी