
लातूर, 12 जुलै (हिं.स.)।
जागतिक पेपर बॅग दिनानिमित्त राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने पेपर बॅग निर्मिती प्रशिक्षण
जागतिक पेपर बॅग दिनानिमित्त महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने विद्यार्थ्यांना पेपर बॅग बनवण्याचे व्यापक व्यावहारिक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.
या कार्यशाळेत रत्नदीप नादरगे यांनी विद्यार्थ्यांना पेपरपासून बॅग तयार करण्याचे तांत्रिक व प्रायोगिक प्रशिक्षण दिले. सदर प्रशिक्षणात महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेचे सर्व छात्र सैनिक आणि विविध शाखांतील विद्यार्थी सहभागी झाले व त्यांनी विविध आकारांच्या व शैलींच्या कागदी पिशव्यांचे नमुने तयार केले.
या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. मस्के यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. तसेच एनसीसी बटालियन लातूरचे कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष नवगन व प्रशासकीय अधिकारी कर्नल वाय. बी. सिंग यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
डॉ. आर. पी. साबदे यांनी आपल्या उद्बोधनात प्लास्टिकच्या अनावश्यक वापरामुळे होणाऱ्या पर्यावरणीय हानीवर जोर देत पेपर बॅगचा वापर वाढवण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे यांनी विद्यार्थी व उपस्थितांना हा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis