
बीड, 12 जुलै (हिं.स.)।
: मृग नक्षत्राच्या सुरुवातीला झालेल्या समाधानकारक पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने कापसाची लागवड केली. कापसाचे कोंबही जमिनीवर आले पण गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने पूर्णपणे दडी मारल्यामुळे आता हे कोवळे अंकुर सुकू लागले आहेत. निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेतकरी पुन्हा एकदा मोठ्या संकटात सापडला असून दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची भीती निर्माण झाली आहे.
पावसाअभावी पिके कोमेजली
जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी महागडी बियाणे आणि खते खरेदी करून कपाशीची लागवड केली. बहुतांश शेतांमध्ये कापसाची उगवण चांगली झाली होती. मात्र पीक वाढीच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यातच पावसाने दडी मारली आहे. कडक ऊन आणि जमिनीतील ओलावा संपल्यामुळे कपाशीची कोवळी रोपे कोमेजून जात आहेत.
शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे
काही भागात विहिरी आणि कूपनलिका (बोअरवेल) असूनही पाण्याची पातळी खालावल्याने पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची कोणतीही सोय नाही अशा कोरडवाहू शेतकऱ्यांची अवस्था तर अत्यंत बिकट झाली आहे. लागवडीसाठी हजारो रुपयांचा खर्च केला आता डोळ्यांदेखत पीक जळताना पाहावे लागत आहे अशी आर्त हाक स्थानिक शेतकऱ्यांनी दिली
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis